सातपुडा पर्वतरांगेत १८ नव्या गुहांचा शोध

अमरावती, दि. १० – मध्य प्रदेशच्या सीमेतील धारुळ या गावानजीक असलेल्या सातपुडा पर्वत रांगेत १८ नव्या गुहांचा शोध लागला असून यात १२ हजार वर्षापूर्वीच्या पाषाण युगातील हत्यारांचे अवशेष व गुहेत कोरलेली चित्रकला आढळून आली आहे. हा ऐतिहासिक शोध असल्याचे मानले जात असून या परिसरात आणखी  गुहा असल्याचा दावा प्राचीन इतिहास व पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी केला आहे.
  मोर्शी तालुक्यातील चिचोली गवळी या गावापासून मध्य प्रदेशची हद्द सुरु होते. याच हद्दीत काही अंतरावरच धारूळ हे गाव लागते. धारुळ हे आदिवासींचे गाव असून या भागातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये प्राचीन गुहा व अश्मयुगीन चित्र असल्याचा शोध अमरावती येथील डॉ. व्ही. टी. इंगोले, प्रदीप हिरूळकर, डॉ. मनोहर खुळे यांच्यासह अन्य तीन पर्यावरण प्रेमी व संशोधकांनी लावला होता. नागपूर येथील प्राचीन इतिहास शाळा व पुरातत्व उत्खनन शाखेच्या चमूने या परिसराला भेट दिली. या परिसरामध्ये तज्ज्ञांनी कुकडसा देव येथे ९, गायमुख परिसरात २ चित्रित गुहा, कोसुंभ येथे २ गुहा, अंबादेवी परिसरात २ प्राण्यांच्या चित्रा व्यतिरिक्त या ठिकाणी लहान मुलाचे व आईचे चित्र सुद्धा सापडले आहे. ते चित्र त्या काळातील कुटुंब संस्थेशी निगडीत आहे.
  अंबादेवी गुफा गट, मुंगसा देव गट, तेलकन देव गट, कुकडसा देव गट, कोसुम गट, गायमुख गट याप्रमाणे गटांची विभागणी करुन सखोल अभ्यास सुरु केला. अभ्यास करताना त्यांना पुराणकालीन, पाषाण युगातील दगडी अवजारे सापडली. यामध्ये छिद्र करण्याचे हत्यार, टोचण पाती, खुरचण अशी अवजारे आहेत. ही अवजारेही तुटक्या अवस्थेत असून अवजारांचे अवशेषच आहेत. याच अवजारांचा वापर गुहा खोदून त्या पूर्णपणे तयार करण्याचा प्रयत्न त्या युगातील मानवांनी केला असावा. वालुकाश्म हा दगड अत्यंत ठिसूळ असल्याने नैसर्गिकरीत्या ही चित्रे व अंकन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या गुहांतील बरीचशी चित्रे दुर्लक्षामुळे नष्ट होत आहेत.

Leave a Comment