पुणे जिल्ह्यात अफू लागवड सर्वेक्षणाचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

पुणे दि.९- पुण्याच्या शिरूर तालुक्यातील अफू लागवड उघडकीस आल्यामुळे चकीत झालेले जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी महसूल विभागाला पुणे जिल्ह्यातील शेतांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
    शिरूर तालुक्यातील वडगांव रासी आणि न्हावरे या दोन गांवात सुमारे दोन एकरावर केलेली अफू लागवड बुधवारी ग्रामीण पोलिसांनी पकडली. कांदा व ऊसात आंतरपिक म्हणून ही लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी सुमारे ७५ किलो वजनाची ही झाडे नष्ट केली. यावर बोलताना जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले की बीड, सांगली सातारा जिल्ह्यांपाठोपाठ आता पुणे जिल्हयातही अफू लागवड ही गंभीर बाब आहे. त्यामुळेच त्यांनी महसूल विभागाला यावर नियंत्रणासाठी कसून प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपातळीवर तलाठ्यांनी अशी अवैध लावगड शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन पार पाडायची असून अशी शेती आढळल्यास त्वरीत स्थानिक पोलिसांना त्याची माहिती द्यायची आहे. त्यानंतरची कारवाई पोलिस विभाग पार पाडणार आहे. या संबंधी स्थानिक पोलिस सुपरिटेंडेंटबरोबर चर्चाही करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
   सातारा, बीड, सांगली जिल्ह्यात या प्रकरणी ज्या शेतकर्‍यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनी अफू लागवडीला बंदी असल्याबद्दल ते अनभिज्ञ असल्याचा दावा केला असून ही लागवड खसखस उत्पादनासाठी असल्याचे जबाबात सांगितले आहे. शेतामध्ये कोणती पिके घेतली जातात याचा उल्लेख सातबार्‍यावर असतो मात्र अफू पिकाचा उल्लेख जेथे लागवड सापडली तेथील जमिनीच्या सातबार्‍यावर नाही असे सांगून देशमुख म्हणाले की सातबार्‍यावरील पिक माहितीत मुख्य पिकांचा उल्लेख असतो. अफूची पीक आंतरपीक म्हणून घेतले गेले होते त्यामुळे त्याचा उल्लेख सातबार्‍यावर नसल्याचा खुलासा तलाठ्यांनी केला आहे.
    शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मात्र या अवैध अफू लागवडीत शेतकरी, स्थानिक राजकारणी आणि पोलिस यांचे संगनमत असल्याचा आरोप केला आहे. शिरूर येथे ज्याच्या शेतात अफू पीक सापडले तो जिल्हा परिषदेच्या सदस्याचा जवळचा नातलग असल्याचे सांगून ते म्हणाले की जुन्नर, आंबेगांव आणि मावळ तालुक्यातही महसूल विभागाने अफू लागवडीची तपासणी करायला हवी.

Leave a Comment