महाराष्ट्रात तीन निर्यात सुविधा केन्द्रे होणार

पुणे दि. ७ – द्राक्षे, गुलाब, कांदे व अन्य कृषी उत्पादने घेणार्‍या शेतकर्‍यांच्या सुविधेसाठी तीन निर्यात सुविधा केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यासाठी १४७४ कोटी ४३ लाख रूपये खर्च येणार आहे. निर्यात सुविधा केंद्रात प्रक्रिया सुविधाही देण्यात येणार असून ही केंद्रे पुण्यातील तळेगांव दाभाडे, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तर सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी विपणन बोर्ड व अपेडा यांच्यामध्ये या संबंधीचा करार नुकताच झाला असल्याचे समजते.
     या केंद्रांसाठी करण्यात येणार्‍या एकूण गुंतवणुकीच्या ७५ टक्के रक्कम अपेडा देणार असून बाकी रक्कम राज्य शासन गुंतविणार आहे. भाजीपाला निर्यातीला प्रोत्साहन देण्याची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे. अर्थात त्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणेही गृहित आहे. ही गरज निर्यात सुविधा केंद्रांच्या माध्यमातून भागविली जाणार आहे. भाजीपाला अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.
  केंद्राने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे दरवर्षी अंदाजे दोन हजार कोटी रूपयांचा भाजीपाला युरोपियन युनियन देशात निर्यात करणे शक्य असून त्यामुळे शेतकर्‍यांनाही चांगला पैसा मिळू शकणार आहे. महाराष्ट्रात वाशी येथे निर्यात प्रक्रिया केंद्र आहे मात्र अधिक निर्यात प्रक्रिया केंद्राची मागणी दीर्घकाळ शेतकरी करत आहेत असे सांगून हे अधिकारी म्हणाले की द्राक्षे, गुलाब, कांदा व अन्य निर्यातक्षम फुले निर्यात करण्यात देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रातून दरवर्षी २५ हजार टन द्राक्षे युरोपियन युनियनला तर ३० हजार टन आशियाई देशांत निर्यात केली जात आहेत. पुणे, नाशिक, लातूर व सातारा हे कांदा उत्पादनात अग्रेसर जिल्हे आहेत.देशात होत असलेल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ९५ टक्के आहे.
   नवीन तीन निर्यात केंद्रे जेथे सुरू होत आहेत त्यापैकी म्हसवड येथे पाच टन क्षमतेचा चिलिग प्लॅट व डाळिब, द्राक्षे व भाजीपाला साठवणुकीसाठी २५ टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे. तळेगांव येथे पाच टन क्षमतेचा चिलिग प्लँट व फुले पॅकींगसाठी पंचवीस टन क्षमतेची मशिनरी बसविण्यात येणार आहे.येथेच कांदा, द्राक्षे, जुलाब, कार्नेशन व लिली यांच्यावर प्रोसेसिग केले जाणार आहे.
चांदवड केंद्रात पाच टन क्षमतेचा चिलिग प्लँट व पंचवीस टन कोल्ड स्टोरेजची सुविधा देण्यात येणार असून येथेच दर तासाला १० टन कांद्यावर प्रक्रीया करण्यात येणार आहे तसेच ५०० टनांची कांदा चाळ उभारण्यात येणार आहे. येथेही द्राक्षे, डाळिंब आणि कांदा साठविला जाणार आहे असे सांगण्यात आले.

Leave a Comment