पुण्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यू

पुणे दि.७- पुण्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य खात्याची झोप उडाली आहे.  या आजाराची लक्षणे आढळणार्‍या प्रत्येक रूग्णाला डॉ. नायडू रूग्णालयात दाखल करण्यात यावे अशा सूचना सर्व दवाखाने आणि रूग्णालयांना देण्यात आल्या आहेत.
   स्वाईन फ्ल्यूची लागण झालेला हा रूग्ण पन्नास वर्षांचा असून तो रिक्षाचालक आहे. आठवड्यापूर्वी त्याच्यामध्ये आजाराची लक्षणे आढळली होती व त्याच्यावर बिबवेवाडीतील खासगी रूग्णायलात उपचार सुरू होते. मात्र तेथील डॉक्टरांना स्वाईन फ्ल्यूची शंका आल्याने या रूग्णाच्या लाळेचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी मिळाला असून त्यात या रूग्णाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर या रूग्णाला त्वरीत दुसर्‍या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याला न्यूमोनियाही झाल्याचे स्पष्ट झाले असून त्याची प्रकृती गंभीर आहे असे सांगण्यात आले आहे. त्याच्या फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे समजते.
  देशात २००९ सालात पहिला स्वाईन फ्ल्यूचा रूग्ण पुण्यातच आढळला होता व त्यानंतर या साथीने देशभरात अक्षरशः थैमान घातले होते.

Leave a Comment