एन. डी. ए. ने भूगावचा जलाशय वापरावा

पुणे दि.७-येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील नौकादलाच्या विद्यार्थ्यांना खडकवासला धरणात पोहोण्यासाठी घालण्यात आलेली बंदी अद्यापीही उठविण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. जुलै ११ मध्ये  या धरणाच्या जलाशयात मगर आढळली होती व तेव्हापासून या जलाशयात विद्यार्थ्यांना पोहोण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र नौकानयन, जलक्रीडा व अन्य उपक्रम या जलाशयात घेतले जात आहेत.
    कांही दिवसांपूर्वीच कालव्यात आलेली मगर पकडण्यात वनविभागाला यश आले होते आणि ही मगर चांदोली अभयारण्यात सोडण्यातही आली होती. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांच्या सरावाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला तेव्हा तेथील अधिकार्‍यांनी वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणावर परिणाम झाल्याची तक्रार केली. अद्यापही या जलाशयात मगरी आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून आमचे विद्यार्थी पोहोण्यासाठी जलतरण तलावाचाच वापर करत आहेत असेही ते म्हणाले.
  वनविभाग, पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांतील अधिकार्‍यांमध्ये  याविषयी अनौपचारिक बोलणी झाली असून प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी सरावासाठी भूगांवचा जलाशय वापरावा असे प्रबोधिनीला सचविण्यात येणार असल्याचे समजते. अर्थात हा बदल ताप्तुरता असून खडकवासला जलाशयातील सर्व मगरी चांदोली अभयारण्यात सोडेपर्यंतच हा बदल स्वीकारावा अशी विंनती प्रबोधिनीला करण्यात येणार आहे. अर्थात प्रबोधिनीतील अधिकार्‍यांबरोबर यासंदर्भात अद्याप बोलणे झालेले नाही असे सूत्रांकडून समजते.
  वनविभागाने चेन्नई क्रोकोडाईल बँक ट्रस्टशी या मगरी पकडण्याबाबत संपर्क साधला आहे मात्र सध्यातरी या ट्रस्टकडे खूपच काम असल्याने त्यांनी वेळ नसल्याचे कळविले आहे असेही समजते.

Leave a Comment