हप्तेखोर पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास बेमुदत संपाचा ज्वेलर्सचा इशारा

मुंबई, दि. ५ – मुंबईतील ज्वेलर्सकडे लाखो रूपयांचे हप्ते मागणार्‍या, ज्वेलर्सकडून विविध कारणांखाली पैसे उकळणार्‍या पोलीस अधिकारी व पोलिसांवर १० मार्चपर्यंत कारवाई करावी. अन्यथा ११ मार्चपासून मुंबईतील १२ हजार ज्वेलर्स आपली दुकाने, कारखाने बंद ठेवून बेमुदत बंद पाळतील, असा इशारा मुंबई ज्वेलर्स असोसिएशन व इंटक संघटनेचे अध्यक्ष राकेश शेट्टी यांनी दिला आहे.
शेट्टी म्हणाले, मुलुंड येथील ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवती जैन यांना दरमहा ५ लाख रूपयांचा हप्ता देण्याची व त्यातील दीड लाख रूपये स्वतः कमिशन घेण्याची ऑफर मुलुंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिवाजीराव जाधव यांनी दिली होती. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी २८ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे आपण केली होती. त्यावेळी गृहमंत्री पाटील यांनी ७ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सह पोलीस आयुक्त रजनी यांना दिले होते. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.
देवीलाल जैन या ज्वेलर्सकडेही दुकानातील सोन्यांच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी इन्श्युरन्स फायनल रिपोर्टसाठी १ लाख रूपयांची मागणी जाधव यांनी केली होती. देवीलाल जैन यांना पोलिसांनी मारहाणही केली होती. मुंबईत अनेक ज्वेलर्सना हप्तेखोर पोलीस त्रास देतात, असे राकेश शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Comment