निवडणूक २०१२ – भाजपासाठी वाटचाल तर काँग्रेसचा भ्रमनिरास

नवी दिल्ली, दि. ०६ मार्च- संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे एकामागोमाग उघड झालेले घोटाळे, एकमेकांचीच विधाने खोडणारे सरंजामी नेते आणि अतिआत्मविश्वासाने जनतेला सामोरे जाणारे युवानेते राहुल गांधी यांना मतदारांनी चांगलाच ’हात’ दाखविला. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमध्ये झालेले काँग्रेसचे पानीपत, पंजाबमध्ये झालेली साफ निराशा, गोवा राज्यातील गमावलेला जनाधार आणि उत्तरखंडच्या जनतेने दिलेला त्रिशंकू निकाल यामध्ये केवळ मणिपूर राज्यातील जनतेनेच काँग्रेसला ’हात’ दिला. तर पंजाब आणि उत्तराखंडची सुभेदारी राखण्यात काठावर मिळालेले यश, उत्तर प्रदेशमधील चमकदार कामगिरी आणि गोव्यात मिळालेली सत्ता यामुळे भाजपाच्या गोटात मात्र बुधवारी जल्लोष झाला. 

देशाच्या राजकारणावर दुरागामी परिणाम करणारे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. निवडणूकपूर्व चाचण्यांनुसार देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये त्रिशंकू राजकीय स्थिती निर्माण होण्याचे अंदाज वर्तविले गेले होते. मात्र यंदा हिरीरिने मतदानासाठी उतरलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांनी राजकीय पंडितांचे अंदाज खोटे ठरवून, समाजवादी पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. मावळत्या मुख्यमंत्री व बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांना मात्र जनतेने अक्षरशः ठेंगा दाखविला. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांपैकी २२४ जागा जिकलेल्या समाजवादी पक्षाला आता सत्तास्थापनेसाठी इतर कोणत्याही पक्षाच्या पाठिब्याची गरज भासणार नाही. अपेक्षेप्रमाणे बसपाला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी त्यांच्या पदरात केवळ ७९ जागाच पडल्या आहेत. भाजपाच्या वाट्याला ४७ जागा आल्या असून, हा पक्ष राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसला कशाबशा २७ जागा जिकण्यात यश मिळाले आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या अजित सिह यांच्या राष्ट्रीय लोकशाही दलाने १० जागा जिकल्या आहेत. तर १५ अपक्ष उमेदवारांनाही जनतेने कौल दिला आहे. 

उत्तर प्रदेशचे जुळे भावंड समजल्या जाणार्‍या उत्तराखंडमध्ये मात्र राजकीय पेच निर्माण झाला आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी ३१ जागा सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात पडल्या असून, ३२ जागा जिकून काँग्रेसने चमकदार कामगिरी नोंदविली आहे. त्यामुळे आवश्यक बहुमतासाठी या दोन्ही पक्षांना चार जागा जिकलेल्या बसपाचा किवा ५ जागा जिकलेल्या अपक्ष उमेदवारांचा पाठिबा मिळवावा लागेल. यापूर्वी २ वेळा भाजपाच्या पाठिब्याने उत्तर प्रदेशमधील सत्ता मिळविणारा बसपा आता भाजपाला मदत करणार की, काँग्रेसला ’हात’ देणार हे पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल. 

यंदा पंजाबची जनता आपल्यालाच कौल देणार असा ठाम दावा करणार्‍या काँग्रेसने आपले मुख्यमंत्री व इतर मंत्रीपदाचे उमेदवार सुद्धा जाहीर केले होते. मात्र पंजाबी जनतेने काँग्रेसवर पुन्हा एकदा प्रमुख विरोधी पक्षाचीच जबाबदारी सोपविली आहे. पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी सत्ताधारी अकाली दलाने ५६ तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाने १२ जागा जिकून स्पष्ट बहुमताकडे आगेकूच केली आहे. काँग्रेसने २००८ च्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी करताना ४६ जागा जिकल्या. या राज्यात पुन्हा एकदा अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांचीच युती सत्तेत येणार, हे स्पष्ट झाले आहे.          

गेली पाच वर्षे ’सुशेगात’ सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस आघाडीची गोमंतक वासियांनी अक्षरशः धुळधाण केली. विधानसभेच्या ४० पैकी २० जागा जिकणारा भाजपा आणि ४ जागा जिकणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एकत्रितपणे सत्तास्थापना करणार, हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला गोव्यात केवळ ९ जागा जिकता आल्या असून, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला तर खातेही उघडता आले नाही. इतर पक्ष व अपक्षांनी एकूण ७ जागा जिकल्या असल्या तरी भाजपाला त्यांच्या पाठिब्याची फारशी आवश्यकता नाही. 

सुदूर ईशान्य भारतातील मणीपूरने मात्र काँग्रेसची इभ्रत राखली असेच म्हणावे लागेल. या राज्याच्या विधानसभेत एकूण ६० जागा असून, त्यापैकी ४२ जागा एकट्या काँग्रेसनेच जिकल्या आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे येथे पानीपत झाले असून, कशीबशी एक जागा जिकण्यात या पक्षाला यश मिळाले. सध्या काँग्रेसशी बिनसलेल्या तृणमुल काँग्रेस पक्षाची कामगिरी सुद्धा यथातथाच झाली असून, त्यांनाही मणीपूरमध्ये कशीबशी एक जागा जिकण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे या राज्यात सलग तिसर्‍यांदा काँग्रेसचेच सरकार येणार हे स्पष्ट आहे. 

सदर पाच राज्यातील विधानसभा निवडणूक म्हणजे २०१४ साली होणार्‍या मध्यावधी निवडणुकीची रंगीत तालिम ठरणार असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे होते. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मिळणार्‍या यशापयशावर देशपातळीवरील सत्ता समीकरणे अवलंबून असल्यामुळे, काँग्रेसचे सरचिटणीस आणि पंतप्रधानपदाचे पक्षातील प्रमुख दावेदार राहुल गांधी यांनी आपले संपूर्ण लक्ष या निवडणुकीवरच केंद्रित केले होते. त्यांनी गेल्या काही आठवड्यात संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये २०० जाहीर सभा घेऊन, काँग्रेसजनांच्या अपेक्षा देखील उंचावल्या. मात्र केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारचा ढिसाळ कारभार, विरोधी पक्षांवर केलेले फुसके आरोप आणि अतिशय खालच्या पातळीवर उतरून अल्पसंख्य अनुनय करण्याचा केलेला प्रयत्नच राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या अंगाशी आल्याचे मत अनेक राजकीय समीक्षकांनी व्यक्त केले आहे. 

पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालाचे संक्षिप्त कोष्टक

उत्तर प्रदेश – एकूण जागा ४०३

समाजवादी पक्ष – २२४

बहुजन समाजवादी पक्ष –  ७९

भारतीय जनता पक्ष – ४७

काँग्रेस व इतर – ३७

अन्य – १५

उत्तराखंड – एकूण जागा ७०

भारतीय जनता पक्ष – ३१

काँग्रेस – ३२

अन्य – ०७

पंजाब – एकूण जागा ११७

अकाली दल – ५६

काँग्रेस – ४६

भारतीय जनता पक्ष – १२

अन्य – ०३

गोवा – एकूण जागा ४०

भारतीय जनता पक्ष व इतर – २४

काँग्रेस – ०९

अन्य – ०७

मणिपूर – एकूण जागा ६०

काँग्रेस – ४२

तृणमुल काँग्रेस – ७

अन्य – ११

Leave a Comment