काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर फरफटत जाऊ नये – बाळासाहेब विखे-पाटील

अहमदनगर, दि. ६ – ज्यांना काँग्रेसची गरज नाही अशा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेस पक्षाने फरफटत जाऊ नये. असे माजी खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांनी सांगितले. सोमवारी अहमदनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, गेल्या पाच-सात वर्षात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे तर काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवायचे असेल तर राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वबळावर निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे.
ज्यांना काँग्रेसवर विश्वास नाही, त्यांच्याबरोबर जाणे जनतेलाही मान्य नाही. म्हणूनच विधानसभा स्वतंत्रपणे लढविण्याच्या उद्देशाने काँग्रेसने कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आगामी काळात काँग्रेसने विकासाची भूमिका घेणे गरजेचे आहे असे सांगत, ते म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या भाऊबंदकीचे तसेच घमेंडखोरीचे राजकारण जनतेला आवडत नाही. समाजाबरोबर विनम्रपणे राहणार्‍यांच्याच पाठीशी समाज उभा राहतो हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. राज्यात तरूण पिढीचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे विकासाची स्पर्धा जरूर असावी मात्र भाऊबंदकीने गावेच्या गावे ओस पडलेली आहेत हा इतिहास आहे. महाराष्ट्राचे तसे होऊ नये ही खरी भीती आहे असे बाळासाहेब विखे-पाटील म्हणाले.

शेती हा महाराष्ट्राचा कणा आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाचे कामकाज महाराष्ट्राच्या विकासाला पूरकच असले पाहिजे. नाशिक महापालिकेच्या निकालाने मतदारांनी सर्वच पक्षांना एक छोटा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काळात सावधपणे वाटचाल करणे आवश्यक आहे. सामाजिक प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे असे सांगत विखे-पाटील म्हणाले, पाणी, वीज, तरूणांचे प्रश्न, शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न असताना जिल्हा परिषद निवडणुकीत या प्रश्नांचा उहापोह झालाच नाही. समाजाला प्रश्नांचा विसर पडावा अशा दृष्टीने एकमेकांचे कपडे फाडण्याचे राजकारण केले गेले हे समाजाच्या दृष्टीने हितावह नाही. ठराविक काळात आमची भाऊबंदकी ऐका व पहा त्यानंतर यथावकाश तुमच्याकडे पाहू अशी भूमिका निवडणुकीत स्वीकारली गेली. व्यक्तीगत निंदा नालस्ती करताना समाजाच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यादृष्टीने विचार करता जिल्हा परिषदेची निवडणूक सामाजिक प्रश्नांवर झालीच नाही असा आरोप विखे-पाटील यांनी केला. राज्य पातळीवर सुरू असलेले भाऊबंदकीचे राजकारण समाजाला परवडणारे नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Comment