
अमरावती, दि.५- देशात अपंग बांधवांना अजूनही पाहिजे त्या प्रमाणात त्यांचे हक्क प्राप्त झालेले नाहीत. अपंग बांधवांकडे आजही समाज दयेच्याच भावनेतून बघत आहे. भविष्यात अपंग बांधवांना मानवी हक्क प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असले तरी ही जबाबदारी सर्वांचीच असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री मुकुल वासनिक यांनी व्यक्त केले.
अमरावतीतील डेंटल कॉलेज परिसरातील अपंग जीवन विकास संस्थेच्या कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेखावत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य दीपक काटोले होते.
आमदार रावसाहेब शेखावत यांनी मागणी केल्याप्रकरणी नव्या आर्थिक वर्षात अमरावतीत अपंग बांधवांना जयपूर फूटचा लाभ मिळवून देण्यासह इतर महत्त्वाच्या विषयांसाठी विशेष शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, देशात शासकीय नोकर्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे केंद्राने लघुउद्योजकांकडून साहित्य व सेवा घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काही हजार कोटींची गुंतवणूक केंद्र सरकारने केली आहे. त्यापैकी ८ हजार कोटी रुपयांचे साहित्य हे अनुसूचित जाती, जमातीच्या लघुउद्योजकांकडून खरेदी केले जात आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेदेखील हे धोरण राबविल्यास आर्थिक सुबत्ता यायला वेळ लागणार नाही. यावेळी रावसाहेब शेखावत यांनी आपले विचार मांडले.
———–
