रेड्डी यांना १२ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी

बंगळूर, दि. २ – बेकायदेशीर खाणकाम प्रकरणात अडकलेले कर्नाटकचे माजी पर्यटनमंत्री जी. जनार्दन रेड्डी यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी १२ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आली आहे.
आंध्र प्रदेशच्या बेकायदेशीर खाणकामात रेड्डी यांच्यासह इतर २० जणांचा सहभाग असून त्यांच्याविरुध्द ऑक्टोबर महिन्यात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. असोसिएट माइनिग कॉर्पोरेशन (एएमसी) आणि डेक्कन माइनिग सिडिकेट (डीएमसी) या खाणी रेड्डी व त्यांची पत्नी अरुणा लक्ष्मी यांच्या मालकीच्या आहेत. सध्या या खाणींची सीबीआयमार्फत कसून चौकशी करण्यात येत आहे.
रेड्डी यांच्या कोठडीची मागणी करण्यासाठी सीबीआयने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करत अतिरिक्त नागरिक आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. अंगाडी यांनी रेड्डींना सीबीआय कोठडी सुनावली. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते व्ही. मुनीयप्पा हे सदर प्रकरणातील इतर आरोपी आहेत.
दरम्यान, या सुनावणीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रसार माध्यमाच्या प्रतिनीधींना काही वकिलांनी मारहाण केली. त्यात एक प्रतिनीधी जखमी झाला. त्यानंतर तेथे जमलेल्या पत्रकारांनी याच्या विरोधात न्यायालयाच्या परिसरात आंदोलन करण्यास सुरुवात केली.

Leave a Comment