गोवा विधानसभेसाठी शनिवारी मतदान

पणजी, दि.2 –  राज्यात येत्या शनिवार दि.३ मार्च रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. सर्व ४० मतदारसंघांमध्ये होणार्‍या या निवडणुकीसाठी २१५ उमेदवार रिंगणात असून त्यातील ७४ अपक्ष आहेत. एकूण १०,२६,३०६ जणांना या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे व मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन व संयुक्त मुख्य निवडणुक अधिकारी नारायण नावती यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
   ही निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची ठरली आहे. निवडणुकीसाठी १०० टक्के मतदारांना ओळखपत्रे देण्यात निवडणूक आयोगाला देशात पहिल्यांदाच यश आले आहे. १६१२ मतदान केंद्रे, १२९ संवेदनशील मतदान केंद्रे, १०,६४४ निवडणूक कर्मचारी, ५ हजारांपेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी, त्या व्यतिरिक्त केंद्रीय राखीव दलाच्या २० कंपन्या, असा या निवडणुकीचा एकूण ताळेबंद आहे. या व्यतिरिक्त १० टक्के कर्मचार्‍यांचा राखीव कोटा तयार करण्यात आला असून आणिबाणीच्या वेळी त्यांना संबंधित मतदान केंद्रांकडे पाठविण्यात येणार असल्याचे वर्धन यांनी सांगितले.
   या निवडणुकीत, सर्वच उमेदवारांना नाकारण्याचाही अधिकार मतदारांना असेल. मात्र त्यासाठी खास नोंदणी पुस्तिका ठेवली जाईल. एकदा मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर मतदाराने मतदान करणे अपेक्षित आहे परंतु ते न करण्याचा अधिकार बजवायचा असेल तर त्याने निवडणूक अधिकार्‍याला त्याची कल्पना देणे आवश्यक आहे. अशा मतदाराची नोंद त्या खास नोंदणी पुस्तकात करण्यात येणार असल्याचे उभयतांनी सांगितले.
  दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी गुरुवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबवला. परंतु घरोघरी मतदार संपर्क अद्यापही सुरूच आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे संपूर्ण गोवाभरातून ६९८ तक्रारी आल्या. यातील ६८१ तक्रारी निकालात काढण्यात आल्या. मात्र १७ तक्रारी अद्याप आयोगाच्या विचाराधीन असल्याचे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment