कर्नाटकात दोन जंगलांना भीषण आग, मौल्यवान संपत्तीचा नाश

विजापूर, दि. १  – कर्नाटक राज्यातील बंडीपूर आणि नागरटोळे या दोन दाट जंगलांना गेल्या आठ दिवसांपासून भीषण आग लागली आहे. या आगीत कोट्यवधी रूपयांची संपत्ती जळून त्याची राखरांगोळी झाली आहे. या आगीच्या प्रचंड भडक्यामुळे जंगलात कोणालाही प्रवेश करणे शक्य नसल्याने हजारो एकर अंतरावर पसरून प्राणी, पशू, पक्षी आणि वनस्पती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या या आगीत तेथे राहणार्‍या गिरीजनांच्या झोपड्या जळाल्या असून त्यांच्या राहण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच प्राण्यांची अवस्था बिकट झाली आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्राण्यांची शरीरे जंगलभर विखरून पडली आहेत, तर अनेक प्राणी मृत पावले आहेत.

       अशा प्रकारचा वणवा पेटू नये यासाठी पूर्वसंरक्षणाची कोणतीही व्यवस्था अरण्यखात्याकडे नसल्याची बाब समोर आली आहे. परंतु या आगीमुळे जंगलातील मौल्यवान संपत्तीचा नाश झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. विशेष म्हणजे हा वणवा अकस्मात लागला असल्याचे गृहीत धरले असले तरी एकाच वेळी अनेक ठिकाणी आगीचा भडका कसा काय सुरू  झाला, अशी चर्चा सुरू झाली आहे. वन्यजीव संरक्षण संस्था आणि राज्य अरण्य खाते यांच्यात या आगीबाबत जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रयल सुरू झाले आहेत. जंगलातील वणव्यांना आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला असताना त्याचा योग्य वापर करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर पंचनामा होऊन कार्यवाही करण्यात येणार असली तरी मौल्यवान वनस्पती व प्राणी यांचे झालेले नुकसान मात्र कधीही भरून काढता येणार नाही.

Leave a Comment