इटालियन नौसैनिकांच्या सुटकेसाठी इटलीचे परराष्ट्रमंत्री भारतात

नवी दिल्ली, दि. २८ फेब्रुवारी-भारतीय मच्छिमारांच्या हत्येप्रकरणी इटलीच्या नौदलातील दोन जवानांना भारताने अटक केल्यासंदर्भात इटलीचे परराष्ट्रमंत्री गिऊलो टेर्झी मंगळवारी भारतात दाखल झाले. टेर्झी यांच्यासोबत अटकेतील दोन जवानांचे कुटुंबीयही  आले आहेत. भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या या दोन जवानांच्या सुटकेसाठी टेर्झी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची भेट घेतली.

दरम्यान, या जवानांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सुनावणी केरळ उच्च न्यायालयात होणार आहे. ठार झालेल्या मच्छिमारांच्या कुटुंबियांनी संबंधित जहाज कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तर, या इटालियन नौसैनिकांना भारताच्या सागरी हद्दीत अटक करण्यात आली असल्याने त्यांच्यावर भारतीय कायद्यांनुसारच खटला चालविला जाईल, अशी  भूमिका भारताने घेतली आहे. त्यामुळे मृत्यू पावलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबियांना भरपाई देऊन हे प्रकरण न्यायालयाबाहेर सोडविण्यात यावे असा प्रस्ताव इटलीने भारतापुढे मांडला आहे. परंतू याला केरळ उच्च न्यायालयाकडून  परवानगी मिळण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या बुधवारी केरळच्या कोलम किनारपट्टी परिसरात इटलीच्या नौदलातील जवानांनी भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केला. त्यात दोघे मच्छिमार ठार झाले. हे मच्छिमार म्हणजे समुद्रीचाचे असावेत असा  संशय आल्याने इटालियन नौसैनिकंानी त्यांच्यावर गोळीबार केला असे नंतर इटालियन जहाजाच्यावतीने सांगण्यात आले.  केरळ पोलिसांच्या विशेष पथकाने या नौसैनिकांना अटक करून रविवारी इटालियन जहाजावरील सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. अटक झालेल्या इटालीच्या नौसैनिकांना कोलम न्यायलयासमोर हजर करण्यात आले.

या जवानांवर भारतीय कायद्याअंतर्गत सुनावणी केल्यास त्याला बराच वेळ लागेल अशी चिता इटलीला सतावत आहे. त्यामुळे त्यांच्यावर इटलीमध्ये खटला चालविण्यासाठी त्यांना भारताने इटलीच्या ताब्यात देण्याची टेर्झी यांनी मागणी केली आहे. इटालियन नौदल या जवानांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी तेथील सरकारवर दबाव टाकत असल्याचे समजते.

Leave a Comment