विदेशातील काळेधन परत आणण्यासाठी भाजपने त्यावेळी काय केले – सोनिया गांधींचा सवाल

पणजी, दि. २५ फेब्रुवारी – विदेशातील बँकांमधील काळ्या धनाची सर्रास चर्चा करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने आपल्या सहा वर्षांच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळात ते धन परत आणण्यासाठी काय केले, असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी फातोर्डा – मडगाव येथे केला. येत्या ३ मार्च रोजी होणार्यां राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. गांधी यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात अनेकदा भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला.

सहा वर्षांच्या कार्यकाळात एनडीएने विदेशातील बँकांमधील काळे धन परत आणण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही?, असा सवाल करून गांधी यांनी भाजपवर ढोंगीपणाचा आरोप केला. अर्थात, भारतीयांचे विदेशातील बँकांमधील हे काळे धन परत आणण्यासाठी केंद्रातील युपीए सरकार सर्व काही करणार आहे. मात्र, त्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. 

लोकपाल विधेयकासंदर्भात केंद्रातील युपीए सरकारची बाजू मांडताना, एक चांगले सक्षम लोकपाल विधेयक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. परंतु भाजप व अन्य काही पक्षांनी ते राज्यसभेत अडवले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

गोव्यात खाण भ्रष्टाचाराचा विषय गंभीर आहे. हा भ्रष्टाचार मोडून काढणे आवश्यक आहे. येथे सगळ्याच खाणी कायदेशीर असतील आणि हा व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर असेल यासाठी काँग्रेस सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रादेशिक आराखड्यावरून लोकांमध्ये नाराजी आहे, जनता अस्वस्थ आहे, मात्र सर्व संबंधितांशी विचार विनिमय करूनच आराखडा संमत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम ठरविण्याचा अधिकार पालकांनाच असायला हवा, असे गांधी म्हणाल्या. 

राज्य विधानसचे सभापती तथा काँग्रेसच्या प्रचार मोहीमेचे प्रमुख प्रतापसिग राणे, मुख्यमंत्री दिगंबर कामत, हंगामी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार फ्रान्सिस सार्दिन, पक्षाचे गोवा प्रभारी जगमितसिग ब्रार, हरीप्रसाद, खासदार सुधाकर रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी नेते याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. फातोर्डा येथील ‘स्पोर्टस् ऑथॉरिटी’च्या मैदानावर ही सभा झाली. गोव्याबरोबरच महाराष्ट्र व कर्नाटकातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते या सभेच्या ठिकाणी गर्दी करून होते.

Leave a Comment