मुंबई,दि.२३फेब्रुवारी- मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जे अपयश आले, त्याचे खापर कुणा एका व्यक्ती किवा पक्षावर फोडता येणार नाही, असा खुलासा मुंबईचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी केला आहे. शेवटच्या पाच दिवसांत महायुती जोमाने कामाला लागली, त्याचवेळी आघाडीचे कार्यकर्ते फाजील आत्मविश्वासामुळे गाफील राहीले, हे सर्वात मोठे पराभवाचे कारण असावे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आघाडीच्या अपयशाचे खापर कुणा एका व्यक्ती किवा पक्षावर फोडणे अयोग्य – जयंत पाटील
मुंबईतील पराभवाची कारणे शोधताना जिल्हानिहाय अहवाल तयार केला जात आहे, असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तुसी नेल्सन यांच्या सर्वेक्षणानुसार राष्ट*वादी पक्षाला २८ ते ३० जागा मिळतील असा अहवाल पाच दिवसांअगोदर आला होता. मात्र, हाच अहवाल प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाला आणि शिवसेना-भाजपकडून अस्तित्वाच्या भीतीने अटीतटीने कार्यकर्ते कामाल लागले असावे. मात्र अहवालावर विसंबून आपले कार्यकर्ते गाफील राहिले असावे, असे पाटील म्हणाले.
काँग्रेससोबत आघाडी केल्याने त्याचा परिणाम अनुकूलच येईल, या गैरसमजात दोन्ही पक्ष राहीले. त्यामुळे आता एकमेकांना दुषणे देण्यापेक्षा जो पराभव झाला, तो मान्य करून चुका सुधारण्यास सुरूवात केली पाहिजे, असे पाटील म्हणाले. मुंबईसारख्या शहरात ३५-४० टक्केच मतदान सक्तीचे करण्यासाठी घटनादुरूस्ती करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
