आम्ही कोण म्हणून काय पुसता ?

मराठी लोक वाङ्रमयात एक फटका प्रसिद्ध आहे. त्यातली एक ओळ फारच मौलिक आहे.तिच्यात शाहीर म्हणतो, माणसाने स्वतःला फार श्रेष्ठ समजू नये.आपण चांगले असू तर आपल्या मनात आपल्या मोठेपणाविषयी यथार्थ जाणीव नक्कीच असावी पण प्रत्येकाच्या या कथित मोठेपणाला काही मर्यादा असतात त्यांचा विसर त्याला पडता  कामा नये.तसा विसर पडून तो वावरायला लागला तर त्याचा अपमान होण्याची शक्यता असते. म्हणून शाहीर म्हणतो, एकाहुन एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. आपण कितीही मोठे असलो तरी जगात एकाहुन एक चढ मोठी माणसे पायलीची पन्नास असतात हे विसरता कामा नये. सैफ अली नावाचा कोणी हिंदी चित्रपटात कामे करणारा नट आहे. आता ही गोष्ट सतत चित्रपट पाहणार्‍या चित्रपट शौकिनांनाच माहीत असणार. सरसकट सर्व चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटातली अभिनयाची शिखरे म्हणतात अशा   काही ठराविक अभिनेत्यांचीच नावे ठावूक असतात. त्यात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित अशी काही ठराविक नावे असतात. सगळ्याच दुय्यम आणि तिय्यम दर्जाच्या कलाकारांना सर्वच जण जाणत नाहीत. पण नेमके असेच लोक आपण फार लोकप्रिय आहोत या भ्रमात जगत असतात आणि लोकांनी आपल्याला ओळखले पाहिजे असे मानत असतात.
    त्या कथित थोरपणाचा त्यांना गर्वही असतो.  लोक खरोखर ज्यांना ओळखतात अशी  एव्हरेस्ट शिखरे मात्र नम्र असतात आणि आपल्याला सार्‍या जगाने ओळखलेच पाहिजे असा अट्टाहास करीत नाहीत. उथळ पाण्यालाच जादा खळखळाट असतो. असे हे सैफ अली खान नावाचे सोंग काल मुंबईतल्या एका बड्या हॉटेलात रात्री बारा वाजता खायला आणि प्यायला गेले होते. तिथे जोराजोराने बोलणे, अमर्याद हसणे आणि हॉटेलातल्या लोकांना विचलित करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असाच त्यांचा समज होता. ज्या लोकांकडे विचारांची खोली आणि वागण्याची परिपक्वता नसते त्यांचे सार्वजनिक ठिकाणचे वागणे असेच असते. ते सभोवतालच्या लोकांचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी नेहमीच असे चाळे करीत असतात. आपल्या अशा वागण्याचा कोणाला त्रास होत असेल याची त्यांना काही जाणीवही नसते आणि काळजीही नसते. ठीक आहे. शेवटी जो तो आपल्या संस्कृतीनुसार वागत असतो. पण त्यांच्या उथळ वागण्याचा कोणाला त्रास होत असेल तर त्याला तसे सांगण्याचा अधिकार नाही असे यांचे म्हणणे असते.
    कोणाला आपला त्रास होत असेल आणि त्यांनी तसे नजरेस आणून दिले असेल तर त्याची माफी मागून आपला गोंधळ कमी करणे ही खरी संस्कृती आहे पण पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या धुंदीत या लोकांना कशाचेच भान नसते. आपल्या टिनपाट आणि अभिनयाचा बेपत्ता असलेल्या कामांवर चार थिल्लर पोरे नाचतात आणि टीव्हीतल्या सवंग रियालिटी शो मध्ये आपल्याभोवती आरत्या ओवाळल्या जातात एवढ्यावर त्यांना सारे काही जिकल्याचा भास होत असतो आणि त्यांना आकाश दोन बोटावर राहिले असल्याचे वाटायला लागते. त्यामुळे आपल्यापासून त्रास झालेल्या लोकांना सॉरी म्हणण्याची नम्रताही त्यांच्यात नसतेच. नम्रता, विनय शीलता हा जमिनीवर पाय असणारांचा सद्गुण असतो. अशा माकडांना तो शोभतही नाही आणि त्यांच्यात तो नसतोही. मेंदूवर वारुणी आरूढ झाली की मग काय पुसता ? आधीच प्रसिद्धीची नशा त्यात पैशाचा माज आणि त्यातच  बाटलीतल्या दारूचा कैफ यामुळे मेंदूत विवेकाचे ठाणे  हलते. ते उधळायला लागते. हात शिवशिवायला लागतात. काहीही केले तरी पोलीस काही करणार नाहीत हा भ्रम असतोच. असे लोक आपल्या प्रसिद्धीची तमा न बाळगता, रस्त्यावरच्या मवाल्यांना शोभेल अशा रितीने लाज लज्जा सोडून देऊन मारामारी करण्यास प्रवृत्त होतात.
    सैफ अली खानने असेच केले. अर्थात त्याची लायकीच तेवढी असेल. कारण आपण कोण आहोत याची त्याला काही आठवणच नाही. आपली आई  ही सुसंस्कृत शालीन अभिनेत्री म्हणून गाजलेली आहे. ती आता सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष आहे. आपले वडील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. एवढेच नाही तर ते जंटलमन क्रिकेटीयर म्हणून ख्यातनाम होते. आपले घराणे हे संस्थानिकाचे आहे. ही पार्श्वभूमी तरी त्याने लक्षात ठेवायला हवी होती. मनामेंदूवर एकदा अविचाराचे मळभ साचले की सारासार विचार आणि तारतम्य यांच्याशी फारकत होते आणि असा हा सुपुत्र सार्वजनिक ठिकाणी मारामारी करायला प्रवृत्त होतो. अनेकांच्या जीवनात असे अनवस्था प्रसंग येत असतात पण तिथे ते  आपल्या प्रतिष्ठेला साजेल अशा संयमाने वागून प्रसंगातून बाहेर पडत असतात. पण ज्याचा आपल्या मनावर, मेंदूवर आणि शरीरावर ताबाच नसतो तो मात्र अशा प्रसंगात ताळतंत्र सोडून वागतो. अशा एखाद्या प्रसंगाने आपल्या प्रतिमेवर जन्मभरासाठी डाग लागतो याची त्यांना यत्किंचितही जाणीव नसते. नंतर पश्चात्ताप होतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. नंतर कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी तो डाग काही पुसून निघत नाही.    

Leave a Comment