जुनागढमधील चेंगराचेंगरीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जुनागढ,दि.२०फेब्रुवारी-सोमवारच्या महाशिवरात्रीनिमित्त जुनागढ जिल्हयातील भावनाथ मंदिरात रविवारी पासूनच भाविकांची गर्दी झाली होती.रविवारी रात्री तेथे अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविक ठार झाले असून यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी  या चेंगराचेंगरीची चौकशी करण्याचे आदेश तातडीने दिले आहेत.

रविवारी रात्री मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना जुनागढमधील नागरी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जत्रेच्या ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे घाबरलेल्या भाविकांनी एकच पळापळ केली. यावेळी ही चेंगराचगरी झाली, असे पोलिसांनी सांगितले. या जत्रेत भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जमले होते.

मंदिराच्या बाजूतील रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यामुळे जखमींना रूग्णालयात घेवून जाताना अडचणी येत होत्या असे रूग्णवाहिकेतील कर्मचार्‍यांनी सांगितले. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, गुजरात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख रूपयाची मदत जाहीर केली आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

Leave a Comment