‘पुरूष’ पुन्हा रंगभूमीवर

पुणे-मराठी व्यावसायिक रंगभूमीच्या सुवर्णकाळात नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नाटकं नव्या रूपात, नव्या संचात करण्याचा ट्रेंड अभिनेते सुनील बर्वे यांच्या हर्बेरियमने आणल्यानंतर, अभिनेत्री नीलम शिर्के यांनीही पन्नास जुनी नाटके रंगभूमीवर आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्याच्या अस्मी प्रॉडक्शनचे तिसरे पुष्प, जयवंत दळवी यांच्या ‘पुरूष’ या नाटकाने गुंफले जाणार आहे. लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
यापुर्वी अस्मी प्रॉडक्शनने ‘बॅरिस्टर’ आणि ‘मोरुची मावशी’ ही दोन नाटके नव्याने रंगभूमीवर आणली होती. आता येणार्‍या ‘पुरूष’ चे दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी करणार असून गुलाबरावची व्यत्ति*रेखाही तेच साकारणार आहेत. अंबिकाच्या भूमिकेत श्रृता प्रभूदेसाई, आईच्या भूमिकेत ज्योती चांदेकर, तर मथुराच्या भूमिकेत रसिका धामणकर दिसणार आहेत. मयूर खांडके आणि रामकृष्ण गाडगीळ अनुक्रमे सिद्धार्थ आणि बाबांची भूमिका साकारत आहेत. नाटकाला बाबा धुरी यांचे संगीत असून नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे आहे. महेंद्र भांबिड नाटकाची प्रकाशयोजना करीत आहेत. या नाटकाचे केवळ पंचवीस प्रयोग होणार असून शुभारंभाचा प्रयोग १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत होत आहे.

Leave a Comment