
इस्लामाबाद, दि.१३फेब्रुवारी- सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यावरील आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायाधिशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मात्र, आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने त्यांना २७ फेब्रुवारीपर्यंतची मुदवाढ दिली आहे. या सुनावणी दरम्यान गिलानी यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी आपण दोषी आढळल्यास पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ असे त्यांनी सांगितले आहे. गिलानींवर ठेवलेले आरोप पूर्णपणे सिध्द झाल्यास त्यांना सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे डॉन या वृत्तपत्राने सांगितले.