उत्सव नको, कृतीची गरज

भारतात अनेक भाषांची साहित्य संमेलने भरतात, परंतु मराठी साहित्य संमेलनाची सर त्यांना येत नाही. कालच्या मराठी साहित्य संमेलनांचे स्वरूप कौटुंबिक होते. साहित्यिक मर्यादित होते आणि संमेलनात बडेजावपेक्षा साहित्यविषयक प्रश्नांची आस्था अधिक होती. साहित्यिकांबरोबरच, विविध क्षेत्रातील माणसे, संस्थानिक सुद्धा आत्मीय जाणिवेने सहभागी होत. मराठी भाषा आणि साहित्य यांचा संसार नेटका असावा या प्रेमापोटी भरणारी त्यावेळची साहित्य संमेलने आणि साहित्य संमेलनांचे अध्यक्ष बडेजावात गुंतून पडत असत. पण अहिस्ते अहिस्ते संमेलनांचा विस्तार होत गेला आणि स्वातंत्र्योत्तर काळातील संमेलनांना गर्दीचे स्वरूप आले आणि या गर्दीचे रूपांतर जत्रेत केव्हा झाले हे कळलेसुद्धा नाही. लेखकांची, प्रकाशकांची आणि संमेलन संयोजकांचीही संख्या वाढली आणि वेगवेगळी वळणेसुद्धा.
या लेखामध्ये त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, साहित्य संमेलनात मराठी भाषा आणि साहित्य यासंबंधीचे काही नवे उपक्रम वा प्रकल्प निर्माण करत आहे का? मराठीत अगणित बोली आहेत. त्या बोलींच्या संदर्भात सांस्कृतिक सामाजिक दृष्टीने अभ्यास, संशोधन आणि नंतर प्रकाराने याबाबतीत काही क्रियाशील पावले टाकता आली का? केवळ शासनानेच हे केले पाहिजे यापेक्षा साहित्य संमेलन संपल्यानंतरचा उरलेला निधी या कामी उपयोगात आणायला हवा, यासाठी मराठीतील भाषाशास्त्र संवाद आणि त्या त्या बोलींच्या जाणकारांवर ही जबाबदारी सोपविता आली नसती का? पण तसे दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
साहित्य संमेलनं कशी असावीत या विषयी डॉ. पानतावणे म्हणतात, सर्व साहित्यसंमेलनं पूर्णत: उत्सवी न होता त्या कार्यशाळा झाल्या पाहिजेत. साहित्य चर्चा, साहित्य समीक्षा आणि संशोधन यावर पूर्ण नसली तरी मोठ्या प्रमाणात भर देणारी असली पाहिजेत. मराठी भाषा संपणार आहे, अडचणीत आहे असे वारंवार तारसप्तकात सांगणाऱ्या विद्वजनांनी हे लक्षात ठेवायलाच पाहिजे, की आता महाराष्ट्रातील अनेक मूक समाज बोलू लागले आहेत, लिहू लागले आहे. त्यांची साहित्य संमेलनं समृद्धपणे भरू लागली आहेत. ग्रामीण भागातील अनेक बोलीतील साहित्य साजिवंत आहे. म्हणून मराठी भाषेला आणि साहित्याला मुळीच मरण नाही. मध्यमवर्गीय आक्रोश थांबायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.ज्योतिबा फुले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे यांचे विचारधन जोवर जिवंत आहे तोवर मराठी भाषेच्या मरणाचा विचार कोणी करू नये.

Leave a Comment