मराठीच्या बोली

प्रत्येक भाषेला बोलींचा गोतावळा असतो. तसा तो मराठी भाषेलाही आहे. वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, झाडीबोली, डांगी, कोकणी या बोलींप्रमाणेच पुणेरी, मुंबईची अशा विविध प्रादेशिक बोली म्हणजे मराठीच्या लेकीसुनाच आहेत. या प्रादेशिक बोलींप्रमाणेच चित्पावनी, देशस्थ, कुणबी, दलित अशा विविध जातिनिविष्ट बोलींचाही वेगळेपणा मराठीच्या विविधतेशी संबंधित आहे. विविध व्यवसायाच्या बोलीचाही मराठीच्या समृद्धतेला हातभार लागत आलेला आहे. मराठीच्या एकाच अंगणात बहरलेल्या या वेली म्हणजे या सर्व प्रकारच्या बोली होत. या सगळ्या बोली ज्यांच्या मुखात आणि लेखात येतात ती सगळी आपण एकाच मराठीची लेकरे आहोत. प्रदेशानुसार, जातिसानुसार किंवा व्यवसायानुसार तिच्या शब्दसंग्रहात प्रत्ययव्यवस्थेत थोडा फार वेगळेपणा आलेला असला तरी तिचा आंतरिक धागा यादवकालापासूनच्या मराठीशी जुळलेला आहे.
        बारा कोसावर भाषा बदलते आणि बोली निर्माण होतात असे म्हटले जाते. तशा मराठीतही यादवकालापासून बोली आहेत. महानुभवी श्रीचक्रधरांच्या लीळाचरित्रात विदर्भातील बोली आहे आणि श्री ज्ञानेश्वर -नामदेवांच्या साहित्यामध्ये नगर-नेवासेची बोलीरूपे आहेत. १७ व्या शतकातील तुकारामांच्या अभंगवाणीत मावळच्या खोऱ्यातील बोली दिसते, तर रामदासांच्या सर्व साहित्यात शिवळ घळीतील मराठी बोलण्यातील रूपे आढळतात. पण या मराठी बोलीच्या अभ्यास जॉर्ज ग्रियर्सनच्या `लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया`च्या १ ते ९ खंडाच्या रुपाने प्रथम झाला. त्यातील सातव्या खंडात मराठी आणि तिच्या बोली याचा अभ्यास आलेला आहे. अहिराणी डांगी यासारख्या मराठीच्या बोलींच्या संदर्भातील त्याची निरीक्षणे आणि निष्कर्ष वादग्रस्त असले, तरी यादृष्टीने भाषेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न म्हणून त्याचा उल्लेख करावा लागतो.

प्रादेशिक भाषा म्हणून महाराष्ट्राची मराठी ही कल्पना यादवकाळापासून आहे. पण भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली ती भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर. पूर्वीच्या मध्यप्रांतातील वऱ्हाड आणि हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडून १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यामहाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील बोलीचा अभ्यास होऊ लागला. भाषिक दृष्टीने त्यांच्या वर्णमाला, शब्दसंग्रह, प्रत्यय व्यवस्था, वाक्यरचना यांच्या अभ्यासातून मराठी भाषेशी असलेले नाते-साम्य स्पष्टपणे लक्षात येऊ लागले. या बोलींच्या भाषिक अभ्यासाला त्यांच्यातील पूर्वकालीन वाङ्मयाच्या अभ्यासाचेही साह्य मिळत गेले.

उदाहरण घ्यायचे तर वऱ्हाडी बोलीचे घेता येते. आजच्या यंत्रयुगात पुण्या-मुंबईचा प्रदेश वऱ्हाड-नागपूर यांच्यापेक्षा अधिक विकसित झालेला आहे, होत आहे. प्राचीन काळी वऱ्हाड / विदर्भ प्रदेशही असाच विकसित व समृद्ध होता. जैन व महानुभाव संप्रदायाचा प्रसार या काळात विशेष होता. आजच्या वऱ्हाडी बोलीचे उमगस्थान या दोन्ही संप्रदायांच्या साहित्यातील बोलीशी आहे, हे भाषाशास्त्रज्ञांनी लक्षात घेतले आहे.

लीळाचरित्र, गोविंदप्रभूचरित्र हे महानुभाव संप्रदायाचे वेदतुल्य ग्रंथ. या पवित्र ग्रंथातील मराठीची भाषा वऱ्हाडी बोलीचे उगमस्थान ठरते. असे मत असलेल्या डॉ. डोळसेंनी वैदर्भी बोलीच्या कोशात -१९७४ प्रस्ताविक पुढील उद्गार काढले आहेत, की सारांश वऱ्हाडी मराठी ही एकीकडून अंशत: प्राचीन व आद्य मराठी तर दुसरीकडून आधुनिक मराठीपासून व व्याकरण मान्यतेपासून दूर असलेली अशी महाराष्ट्रातील प्रमुख बोली आहे. आजही या बोलीत तुरळक वाङ्मयनिर्मिती होत असलेली दिसते.

वऱ्हाडी, हळबी, नागपुरी या बोलींचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या शब्दसंग्रहात हिंदी शब्दाचा भरणा विपुल प्रमाणात आहे. इंग्रजांच्या काळातील या मध्यप्रांतात हिंदी व मराठी भाषिक इथे एकत्र राहत होते. हिंदी भाषेच्या क्षेत्राचेही वऱ्हाडी बोलीला सान्निध्य आहे. तसेच जुन्या मराठीचे अवशेष वऱ्हाडी बोलीच्या सर्वनामात कायम आहेत. (उदा. ही, जी, ती, ऐवजी, हे, जे, ते) मले, तुले, मज, तुज – द्वितीया-चतुर्थी तसेच तृतीचेची रूपे – म्या, तू,त्वा इ. डॉ. कोलतेच्या लेखनात तर त्यांनी मीने, तूने असा `ने` चा प्रत्यय, मी, तू, सर्वनामांना योजलेला दिसतो. करून राह्यला निजून राह्यला करूनशान जेवूनशान असे वैदिक संस्कृतशी नाते सांगणारा प्रत्यय कायच्याऐवजी काव्हून काम्हून अशी बोली रूपे अशा वेगळेपणाने वऱ्हाडी बोली लक्ष वेधून घेते. वऱ्हाडी बोलीत स्त्रियांच्या तोंडीही मी जातो मी करतो असे प्रयोग असतात. एके काळच्या समृद्ध ग्रंथनिर्मिती असलेल्या वऱ्हाडी बोलीतील शब्दसंग्रहही विपुल क्षेत्रांना स्पर्श करणारा आहे.

नागपुरी बोली हा डॉ. व.कृ.वऱ्हाडपांडेंचा प्रबंध. त्याच्या आधारे या बोलीचे स्वरुप लक्षात घेताना तिचे वऱ्हाडी बोलीशी असलेले साम्य नजरेत भरते. या बोलीतही मले-तुले असा द्वितीया-चतुर्थीचा एकवचनी प्रत्यय आहे. मी, तू, या सर्वांना तृतीयेचा न प्रत्यय लागून मीन, तून अशी रूपे या बोलीत साधली जातात. प्रमाण मराठीतील `मी गेले` ऐवजी `मी गेली` असा ली प्रत्यय भूतकाळ दर्शवितो. पाहून राह्यली करून राह्यली या रूपातही वऱ्हाडीशी साम्य पण शान किंवा शानी ऐवजी करून सन्या म्हूनसन्या अशी रूपे रूढ आहेत. वऱ्हाडीवर जसा हिंदीचा प्रभाव आहे तसाच नागपुरी बोलीवरही आहे.

 

  • प्रा. डॉ. लीला गोविलकर