झाडा-फुलांचा जिव्हाळा जपणारी कविता


निसर्गाचे विभ्रम आणि कविता यांचं एक अतूट असं नातं असतं. निसर्गाचं रूप टिपणारी कविता शुद्ध आस्वादपर, वर्णनपर असू शकते, तशी ती अनेकदा मानवी जीवनाशी या निसर्गाला जोडून एक विलक्षण असा आविष्कार घडवते. मराठीतील एक ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांची कविता याच जातकुळीतली आहे. मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला त्यांचा ‘बरेच काही उगवून आलेले’ हा कवितासंग्रह जगण्यात निसर्गाच्या खुणा शोधत जाणाऱ्या कवितांनी सजलेला आहे.

धामणस्करांच्या कवितेतून भेटणारा निसर्ग वाचकांच्या ओळखीचा आहे. निसर्गातले त्यांचे सर्वात जवळचे घटक म्हणजे हिरवेपणा उधळणारी झाडं आणि रंगवर्षाव करणारी फुलं. माणूसही तसा निसर्गाचाच भाग आहे, पण झाडा-फुलांमधले रंग-विभ्रम त्याच्यात नाहीत. मात्र त्यांना टिपणारी संवेदनशीलता माणसाकडे नक्कीच आहे. म्हणूनच मनुष्य आपल्या जगण्याच्या संदर्भात निसर्गाचा विचार करतो, निसर्गात स्वतःच्या आयुष्याच्या खुणा शोधू पाहतो, झाडा-फुलांच्या तटस्थपणे फुलण्या-कोमेजण्यातून आपल्या जगण्याचे संदर्भ जागवतो. धामणस्करांची कविता याच पठडीतली आहे. निसर्ग हा त्यांच्या अनुभवाचा आणि चिंतनाचा विषय आहेच पण तो केवळ सौंदर्याचा आविष्कार म्हणून किंवा दृश्य जाणीवांचा आस्वाद म्हणून अवतरत नाही. मानवी आयुष्यातल्या विविध जाणीवांशी कुठेतरी तो एकरूप होऊन जातो, तर कधी या आयुष्यातला एक संदेश तो देतो. म्हणूनच धामणस्कर हे निसर्ग कवी असले तरी ते फक्त निसर्गपूजक कवी नाहीत. निसर्गप्रेमी तर ते नक्कीच आहेत. याच कारणाने त्यांच्या कवितेत निसर्गाच्या बरोबरीने आयुष्याचे संदर्भही डोकावतात. या दोहोंचं नातं विणतच त्यांची कविता साकारते.

Leave a Comment