परीक्षा मुलांची ? छे पालकांची !

परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. कालच बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.बारावीची परीक्षा २० फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा १ मार्चला सुरू होणार आहे. आता मुलांचा ओढा (आणि अर्थातच पालकांचाही) व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असल्याने तसे दहावीचे महत्त्व उरलेले नाही. त्यापेक्षा बारावीचे महत्त्व वाढले आहे. पण तरीही बारावी सोबत दहावीच्याही परीक्षेचे टेन्शन वाढताना दिसत आहे.  सध्याच्या जीवनामध्ये परीक्षेत मिळणारे गुण हा यशस्वीतेचा मानदंड ठरला आहे. त्यामुळे ज्या मुलाला जास्त गुण मिळतील, तो मुलगा हुशार असे मानले जाते आणि गुण हे परीक्षेतल्या कामगिरीवर ठरतात. त्यामुळे आपल्या जीवनात परीक्षा आणि परीक्षेतले गुण यांना अनावश्यक महत्व आलेले आहे. आपल्या मुलाला किवा मुलीला परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्याचे किवा तिचे आयुष्य वाया जाईल, असा भ्रम पालकांच्याही मनात तयार झालेला आहे. त्यामुळे आधी मुलांच्या मनात आणि नंतर पालकांच्या मनात परीक्षेचा तणाव व्यापून उरलेला दिसत आहे. परीक्षेच्या काळामध्ये हा तणाव तर पराकोटीला गेलेला दिसतो. 

     मुलाला अधिक मार्क मिळाले पाहिजेत यासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेले पालक मुलाला ८० टक्क्यांपेक्षा अधिक आणि जमलेच तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेच पाहिजेत असा हट्ट धरून बसतात आणि तेवढे गुण मिळविण्याच्या त्यांच्या अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेतलेला विद्यार्थी त्या ओझ्याने दबून जातो. खरे तर मुलांना मार्कांचे फार टेन्शन नसते. पण पालकांत ते आधी निर्माण होते आणि मग मुलांनाही ते टेन्शन व्यापायला लागते. या संबंधात एका इंग्रजी दैनिकाने पालकांचे एक सर्वेक्षण केले असता पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव असल्याचे आढळले. आपल्या मुलाला नेमके किती मार्क मिळतात या काळजीने आपण त्रस्त आहात का, असा प्रश्न पालकांना विचारला असता मुंबईतल्या ७८ टक्के पालकांनी तर कोलकत्त्यातल्या ८४ टक्के पालकांनी होकारार्थी उत्तर दिले. म्हणजे जवळपास ८० टक्के पालक मुलाच्या मार्काचे टेन्शन घेऊन जगत आहेत. त्यातल्या १५ टक्के पालकांनी आपल्या मुलाला ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले पाहिजे अशी अपेक्षा ठेवलेली आहे. ७५ ते ९० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळावेत, अशी ६० टक्के पालकांची अपेक्षा आहे.

    त्या मुलाची बौद्धिक क्षमता आणि अधिकाधिक मार्क मिळविण्याची कुवत नेमकी किती आहे याचा कसलाही विचार न करता या पालकांनी या अपेक्षा ठेवलेल्या आहेत, हे त्यांच्या मुलांचे दुर्दैव आहे. या पालकांचे मार्कांच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. भरपूर ट्यूशन लावल्या की मुलाचे मार्क वाढतील, असे यातल्या बर्‍याच पालकांना वाटते. म्हणून असे पालक आपल्या इतर गरजा कमी करून मुलांच्या ट्यूशन क्लासेसवर भरमसाठ खर्च करतात आणि आपण आता भरपूर खर्च केला असल्यामुळे मुलाला ९० टक्के मार्क मिळालेच पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असतो. एवढ्यावरही ज्या मुलाची कुवत जास्त असते तो पालकांच्या अपेक्षेप्रमाणे मार्क मिळवतो. परंतु ज्या मुलाची कुवतच नसते त्या मुलांना केवळ ट्यूशन लावल्यात म्हणून असे भरमसाठ मार्क मिळत नाहीत आणि हे पालक भयंकर निराश होतात. खरे म्हणजे चार-दोन टक्के मार्क कमी मिळाले तरी मुलाच्या भवितव्यावर फारसा काही गंभीर परिणाम होत नसतो. परंतु व्यवसायाच्या विभिन्न शाखांच्या बाबतीत अनभिज्ञ आणि अज्ञानी असलेले हे लोक निराश होतात. अशा पालकांचा भरपूर ट्यूशन लावण्याकडे असलेला ओढा बघून काही ट्यूशन क्लासवाले सुद्धा चांगला धंदा करतात.    दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण पॅकेज देणारे अनेक क्लासेस आहेत, ज्यांची फी २५ हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत आहे.     

या क्लासेसचा थोडाफार उपयोग होतो. परंतु त्यासाठी एवढ्या वारेमाप फीची काहीही गरज नाही हे वेड्या पालकांना कळत नाही. या क्लासेसमध्ये सुद्धा दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांची बॅच असते आणि तिथे सुद्धा प्राध्यापक मंडळी कॉलेजप्रमाणेच पाट्या टाकत असतात. परंतु शाळेपेक्षा क्लासेसचे शिक्षण चांगले असते अशा भ्रमात असणारे पालक ट्यूशन क्लासला अवास्तव महत्व देतात. ही तर पैशाच्या नासाडीची बाब झाली. या सगळ्या तणावामध्ये मुलांच्या आणि पालकांच्याही आहारावर, झोपेवर आणि एकूणच आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होत असतात. याकडे भारतातल्या मोठ्या शहरातील डॉक्टरांनी गंभीरपणे लक्ष दिलेले आहे. परंतु आरोग्य बिघडले तरी चालेल, मात्र मुलाने भरपूर मार्क मिळवून डॉक्टर किवा इंजिनिअर होऊन आपली प्रतिष्ठा वाढवली पाहिजे हा पालकांचा आग्रह काही कमी होत नाही. खरे तर पंधरा ते अठरा वर्ष ही मुला मुलींच्या शरीराची वाढ होण्याची अवस्था असते. पण या काळात परीक्षेच्या तणावामुळे मुलांना पुरेशी झोप आणि आराम मिळत नाही.त्याला जन्मभर त्याचा त्रास होतो.