मुंडे कुटुंबात फूट

गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या एका ज्येष्ठ नेत्याचे घर फुटल्याचे दाखवता येते म्हणून या प्रवेशाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उपस्थित होते. आमदार धनंजय मुंडे तांत्रिक कारणामुळे राष्ट्रवादीत येऊ शकत नसले तरी ते मनाने आता राष्ट*वादी काँग्रेसमध्येच आहेत. एकंदरीत गोपीनाथ मुंडे यांचे कुटुंब राजकारणात तरी विभक्त झाले आहे. ते केवळ विभक्तच झाले असे नाही तर गोपीनाथ मुंडे ज्या पवार घराण्याशी सतत उभा दावा मांडत असतात त्या पवार कुटुंबाने हे घर विभक्त केले आहे आणि त्यांच्याच पाठबळावर आता पंडितअण्णा आणि धनंजय हे पिता-पुत्र गोपीनाथ मुंडे यांना आव्हाने द्यायला लागले आहेत. एकंदरीत भाऊबंदकीला मोठा जोर आलेला आहे. इकडे हे पक्षांतराचे नाट्य सुरू असताना गोपीनाथ मुंडे यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपले बंधू, पुतण्या आणि अजित पवार या तिघांनाही मोठे आव्हान दिले.
    अजित पवार आपल्याला राजकारणातून संपवायला निघालेले आहेत, परंतु आपण संघर्षातून पुढे आलेलो असल्यामुळे अजित पवारांना हे शक्य नाही. त्यासाठी त्यांना तीन जन्म घ्यावे लागतील, असे मुंडे यांनी म्हटले. एकंदरीत मुंडे यांच्या घरातील हा संघर्ष आगामी काही दिवस तरी बातम्यांचा, पत्रकार परिषदांचा आणि चर्चांचा विषय राहणार आहे. मात्र या पुढे काय? याचा विचार करण्याची गरज आहे. अजित पवार यांना यातून काय साध्य करायचे आहे याचा धांडोळा घेण्याची गरज आहे. कारण गोपीनाथ मुंडे हे एकेकाळी महाराष्ट*ाचे उपमुख्यमंत्री होते आणि राज्याचा मुख्यमंत्री होण्याची त्यांची जबरदस्त महत्वाकांक्षा आहे. पवारांचीही अवस्था अशीच आहे. ते आजच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि एक ना एक दिवस मुख्यमंत्री होण्याची त्यांचीही मनिषा आहे. राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर मुख्यमंत्रिपदाची मनिषा बाळगणार्‍या मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचे अवमूल्यन करणे आवश्यक आहे हे पवारांना माहीत आहे आणि इथे तर कसलेही प्रयत्न न करता अशी संधी स्वतःहून चालून आलेली आहे. मग ती गमवायची कशाला?
    मुंडे यांच्या घराण्यामध्ये भाऊबंदकीचे लोखंड आयतेच तापलेले आहे तेव्हा त्यावर आपले दोन घाव घातल्यामुळे त्याचे दोन तुकडे होणार असतील तर ते घाव घालण्यास मागेपुढे बघण्याचे कारणच काय? असा प्रश्न पवारांना पडला असणारच. ते नेतृत्वाच्या बाबतीत अनेक ठिकाणी कमी पडत असले तरी अशी संधी साधण्याएवढे शहाणपण त्यांच्याकडे नक्कीच आहे. मुंडे यांचे परळीतील वजन कमी होणे आणि त्यांनी परळीतच गुंतून राहणे हा अजित पवार यांच्या दृष्टीने मोठा विजय आहे आणि हा विजयाचा क्षण त्यांना धनंजय आणि पंडितअण्णा यांनी मिळवून दिला आहे. त्यामुळे पवारांनी त्यांचा मोठा सत्कार केला. आता यापुढे या पिता-पुत्राचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित होतो. खरे म्हणजे हे पिता-पुत्र म्हणजे काही मोठे निष्णात राजकारणी नव्हेत. पंडितअण्णा यांनी गोपीनाथ मुंडे यांना वडिलांच्या पश्चात सांभाळून मोठे केले. याचा अर्थ गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्ण राजकीय भवितव्याचे ते शिल्पकार नव्हेत. तरुण वयात मोठ्या भावाच्या आधाराने वाढले असले तरी गोपीनाथ मुंडे यांनी नंतरचे आपले राजकारणातले स्थान प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःच्या ताकदीवर संघर्ष करून निर्माण केलेले आहे.
    या सार्‍या संघर्षाचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या महाराष्ट*ाच्या राजकारणातल्या स्थानाचा विचार केला तर पंडितअण्णा आणि धनंजय हे पिता-पुत्र त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकू शकत नाहीत. त्यामुळे हे दोघे पक्षातून गेल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावर फार मोठा गंभीर परिणाम होईल असे अजिबातच संभवत नाही आणि या दोघांना सुद्धा राजकारणात फारसे मोठे स्थान मिळणार नाही. एखादा किरकोळ माणूस फितूर होतो तेव्हा त्या क्षणाला त्याला किमत दिली जाते. सत्कार केला जातो, त्यामुळे तो हुरळून जातो. पुढे त्याला त्याची खरी जागा दाखवली जात असते. आज पंडितअण्णा आणि धनंजय यांच्या रुपाने गोपीनाथ मुंडे यांना खिजविण्याची संधी अजित पवारांना मिळत आहे म्हणून या पिता-पुत्रांना एवढी किमत दिली जात आहे. ती त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. पण ती सध्याच दिली जात आहे. नंतर त्यांना खिजगणतीत सुद्धा धरले जाणार नाही. काकांना धडा शिकविल्याच्या आनंदात धनंजयला याचे भान नाही आणि धाकट्या भावाचा पाणउतारा होतोय याच्या समाधानात पंडितअण्णांना सुद्धा काही तारतम्य राहिलेले नाही.
    गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे आणि महाराष्ट*ाचे राजकारण मोठ्या हिकमतीने केलेले आहे. ते राजकारणात पुढे जायला लागले तसे त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. मात्र या दुरावलेल्या लोकांमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या स्थानाला फारसा धक्का लागलेला नाही. तीच बाब पंडितअण्णा आणि धनंजय यांना लागू होते. त्यांच्या जाण्याने गोपीनाथ मुंडे संपणार नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे एक निकटचे सहकारी माजी खासदार जयसिग गायकवाड हेही मुंडे यांच्यावर चिडून राष्ट*वादीत गेले होते. तिथे त्यांना खासदारही करण्यात आले. परंतु कालांतराने राष्ट*वादीचे खरे स्वरूप त्यांच्या लक्षात आले आणि ते आता भाजपामध्ये परत आले आहेत. पंडितअण्णा आणि धनंजय भाजपात परत येतील की नाही सांगता येत नाही, पण त्यांना जयसिग गायकवाड यांचासारखा पश्चात्ताप मात्र नक्कीच होईल.

Leave a Comment