
पुणे दि.३- पुण्यातील वाहन उत्पादक कंपन्यांनी२०१० च्या तुलनेत २०११ सालात चांगला व्यवसाय केला असल्याचे कंपन्यांकडून जाहीर होत असलेल्या विक्रीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अर्थात बाजारपेठेतील व एकूणच जागतिक मंदीचा फटका या क्षेत्रातील कांही कंपन्यांना जाणवला असला तरी एकूण उद्योगाच्या उलाढालीचा विचार केला तर २०११ हे वर्ष कंपन्यांना चांगलेच गेले असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे.मर्सिडीज बेंझ इंडिया कंपनीची वाहनविक्री गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्कयांनी वाढली असून त्यांच्या सर्व मॉडेल्सना चांगली मागणी आली आहे. यंदा कंपनीने ७४३० वाहने विकली असून गतवर्षी ही संख्या ५८१९ इतकी होती. बाजारपेठेत मंदी नसती तर ही विक्री आणखी वाढली असती असे कंपनीच्या सेल्स विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
बजाज ऑटोने आपली आकडेवारी सोमवारी जाहीर केली असून त्यानुसार मोटरसायकल व व्यावसायिक वाहने यांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाली असल्याचे दिसून आले आहे. केवळ डिसेंबर ११ मध्ये कंपनीने २ लाख ६३ हजार ६९९ मोटरसायकल्स विकल्या असून गेल्या डिसेंबरमध्ये हा आकडा २लाख ४३ हजार ६७५ इतका होता. व्यावसायिक वाहनांच्या आकडेवारीत गतवर्षीच्या डिसेंबरमध्ये विकल्या गेलेल्या २३१२८ वाहनांच्या तुलनेत डिसेंबर २०११ मध्ये ४१९९१ वाहने विकली गेली आहेत. मोटरसायकल व व्यावसायिक वाहनांची नियात १ लाख १९ हजार ७०८ वाहने इतकी असून दुचाकीच्या विक्रीत देशात ८ टक्के तर निर्यातीत ३३ टक्के वाढ झाली असल्याचे मोटरसायकल डिव्हीजनचे अध्यक्ष के.श्रीनिवास यांनी सांगितले. स्वदेशी बाजारपेठेवर मंदीचा परिणाम जाणवला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
टाटा मोटर्सनेही यंदा निर्यातीत चांगलीच प्रगती केली असून त्यांनी डिसेंबर११मध्ये ८२ हजार २७८ व्यावसायिक व प्रवासी वाहने निर्यात केली आहेत. ही निर्यात वाढ गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्के अधिक आहे. स्वदेशी बाजारपेठेत त्यांनी ७६ हजार ६६३ व्यावसायिक व प्रवासी वाहने विकली असून ही वाढ गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के अधिक असल्याचे कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्यांनी सांगितले.