
पुणे दि.२३-सरकारने उपोषणासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही तर तुरुंगात बसून उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी शुक्रवारी राळेगण सिद्धी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. अण्णांच्या २७ डिसेंबरपासून सुरू होणार्या बेमुदत उपोषणासाठी मुंबईतील दोन जागा तर दिल्लीतील रामलिला मैदानाचा विचार सुरू आहे. मुंबईत उपोषणासाठी जागा दिली नाही तर तुरूंगात उपोषण करेन असे अण्णांनी जाहीर केल्यामुळे आता तिहार तुरूंगातील उपोषणाची पुनरावृत्ती पाहायला मिळणार काय अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील आझाद मैदान अथवा वांद्रा कुर्ला संकुलात उपोषण केले जाणार असल्याचे अण्णा टीमने जाहीर केले असतानाच दिल्लीतील रामलिला मैदानाचाही विचार केला जाऊ शकतो असेही सांगितले जात आहे. मात्र उपोषण होणारच यावर सारेजण ठाम आहेत.
दरम्यान ३० डिसेबरपासून सुरू करण्यात येणार्या जेल भरो आंदोलनासाठी टीम अण्णा सरसावली असून त्यासाठी ऑनलाईन, एसएमएस या पर्यायांचा वापर केला जात आहे. देशातील शहरात जागोजाग समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून वेबसाईटही तयार करण्यात आली आहे.