
लोकमान्य टिळकांना ब्रिटीश सरकारने सहा वर्षांसाठी मंडालेच्या तुरुंगात ठेवले तेव्हा या एकांतवासाचा लाभ उठवीत टिळकांनी तिथे कागद पेन्सील आणि काही ग्रंथ मागवून घेतले आणि गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. टिळकांना तो ग्रंथ तिथे सुचलेला नाही. त्यांच्या मनात तो बालवयापासून ठसलेला होता. त्यांचे वडील मरणपंथाला लागले तेव्हा टिळकांना त्यांच्या उशाशी बसून गीता वाचण्याचे काम करावे लागले. त्यावेळपासून त्यांच्या मनात भगवदगीता नेमकी काय आहे असा प्रश्न रेंगाळायला लागला होता. गीतेचा नेमका अर्थ काय आहे, ती कशासाठी सांगितली गेली असे अनेक प्रश्न केवळ टिळकांच्याच नव्हे तर इतरही अनेक विचारवंतांच्या मनात रेंगाळत आले आहेत. टिळकांनी आपल्या परीने या तत्त्वज्ञानापर ग्रंथाचा अर्थ सांगण्याचा गीतारहस्य या ग्रंथात प्रयत्न केला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी गीता हा ‘तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला हिरा आहे’ असे म्हटले आहे. गीता हा हिदू धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे असे टिळकांनी कधी म्हटले नाही. गीतेचा अभ्यास अनेक विचारवंतांनी केला आहे. त्यात अनेक धर्मांचे आणि अनेक देशातले विचारवंत आहेत पण त्यातल्या कोणीही या ग्रंथाला हिदू धर्माचा धार्मिक ग्रंथ असे चुकूनही म्हटलेले नाही.
आता हे सांगण्याचे कारण असे की सध्या गीतेच्या विरोधात रशियात एक खटला चालला असल्याच्या बातम्या आल्या आहेत. या खटल्याच्या बातम्या चुकीच्या पद्धतीने देणार्या काही माध्यमांनी या गोष्टीत दोन चुका केल्या आहेत. पहिली म्हणजे हा हिदू धर्माचा धार्मिक ग्रंथ असल्याचे म्हटले आहे आणि हा खटला गीतेच्या विरोधात असल्याचेही म्हटले आहे. श्रीकृष्ण हा हिंदू होता आणि त्याने गीतेत जीवन सुखी करण्याचा मार्ग सांगितला आहे. आपण सारे लोक श्रीकृष्णाला देव मानतो आणि त्याने सांगितलेल्या या ग्रंथाला हिदू धर्मियांचा धार्मिक ग्रंथ म्हणून बसतो. जे लोक गीता नीट ऐकत नाहीत, पहात नाहीत, समजून घेत नाहीत ते लोकच या ग्रंथाला आपला धार्मिक ग्रंथ मानत असतात. एकदा एखाद्या माणसाला, ग्रंथाला असे देव मानून टाकले की त्या ग्रंथाला प्रदक्षिणा घालून, त्याची मिरवणूक काढून आपण धन्य होतो. आता आपली सारी पापे प्रत्येक प्रदक्षिणे सरशी नष्ट होतील असा या लोकांचा भ्रम असतो. मग श्रीकृष्णाला माणूस समजून त्याला समजून घेण्याची आणि गीतेत काय सांगितले आहे हे नीट वाचायची आपल्याला काही गरजच रहात नाही.
त्यातूनच दुरभिमान निर्माण होत असतो आणि या ग्रंथाला कोणी काही म्हटले की आपले पित्त खवळायला लागते. गीता हा व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि मानस शास्त्राचा ग्रंथ आहे. तो एका हिदू विचारवंताने लिहिला म्हणून हिदू धर्माचा धार्मिक ग्रंथ होत नाही हे या लोकांना का समजत नाही ? आता रशियात बंदी घालण्यात आली आहे ती सुद्धा गीतेवर नाही. इस्कॉन या संस्थेचे संस्थापक ए.सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी लिहिलेल्या ‘गीता, आहे तशी’ या ग्रंथाच्या रशियन अनुवादाला बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ही बंदी अजून घातलेली नाही. तशी मागणी एका रशियन व्यक्तीने न्यायालयात केली आहे आणि अर्जाचा निकाल आज दिला जाणार आहे. निर्णय देण्यापूर्वी न्यायालयाने या ग्रंथाविषयी टॉम्स विद्यापीठातल्या तज्ज्ञांचा अभिप्राय मागितला आहे. तो अभिप्राय प्रतिकूल आला आणि तो मान्य करून न्यायालयाने या ग्रंथावर बंदी घातली तरी त्या अभिप्रायातल्या चुका दाखवून वरच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळाच राहणार आहे. मग तिथे इस्कॉनच्या लोकांना आपले मत मांडता येईल. आताच या प्रश्नावर हिंदू धर्माचा अपमान झाल्याचा गाजावाजा करण्याची गरज काय ? रशियातल्या हिंदूंना अजून तरी कोणी देशाच्या बाहेर जाण्याचा आदेश दिलेला नाही.
या ग्रंथावर बंदी घालण्याची मागणी करणारेही बरेच मूढ दिसत आहेत. त्यांना गीता तर कळलेली नाहीच पण, त्यांना सध्याच्या काळात संवाद साधनांचा झालेला तांत्रिक विकासही माहीत नाही. सध्या कोणत्याही ग्रंथावर बंदी घालण्याचा विचार व्यवहार्य ठरत नाही. इंटरनेट, मोबाईल फोन अशा साधनांमुळे बंदी घातलेले ग्रंथ जगभर पोचवता येतात. तेव्हा न्यायालयाने बंदी घातली म्हणून या ग्रंथाच्या प्रसारावर बंदी येत नाही. पुस्तकावर बंदी घालता येईल पण त्या ग्रंथातल्या विचारावर बंदी घालता येत नसते. त्या रशीयन पंडिताला कदाचित ही गोष्ट माहीत नसावी की १९९० साली रशीयाचे अध्यक्ष असलेले मिखाईल गोर्बाचेव हे गीता वाचत होते आणि रशियात लोकशाही वादी क्रांती घडवण्यास त्यांना गीतेने प्रेरणा दिली होती. ट*ायनबी या पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्याने गीतेचा अभ्यास केला होता. जगात पहिला अणुबाँब तयार करण्याच्या प्रकल्पाचा प्रमुख ओपनहायमर याचीही गीतेवर श्रद्धा होती. आपला धर्म न सोडता त्यांना हे करता आले कारण तो मानवतेचा ग्रंथ आहे. आपले कोणतेही काम करताना आपल्या मनात कर्तव्याची भावना सर्वोपरी असली पाहिजे असा संदश देसारा हा ग्रंथ आहे. रशीयन लोकांनी त्यावर बंदी घातली तर त्यांचे नुकसान आहे.
