नेत्रपटले उपलब्ध झाल्याने पुण्यात चाळीस जणांना मिळाली नव्याने दृष्टी

पुणे दि.१६- स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, शासनाच्या चांगल्या योजना आणि सातत्याने सुरू असलेले प्रयत्न यासार्‍यांमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी चांगली जागृती होत असून नेत्रपेढ्यांची संकल्पना तेथे चांगली रूजू लागली असल्याचे दिसून येत आहे.पुण्यातील एच.व्ही. देसाई नेत्र रूग्णालयाने या वर्षात पुण्याजवळच्या बारामती, शिरूर येथून तर नंदुरबार आणि उद्गीर जिल्ह्यातील अंतर्गत खेड्यापाड्यातून सुमारे ८० नेत्रपटले मिळविण्यात यश मिळविले आहे. यामुळे ४० अंधांना दृष्टी प्राप्त झाली आहे. ग्रामीण भागातून नेत्रदानाचे प्रमाण वाढल्यास देशाची प्रत्यक्षातली गरज आणि केवळ शहरी भागापुरतेच मर्यादित राहिलेल्या नेत्रदान कार्यक्रमांमुळे प्रत्यक्षात उपलब्ध होणारे नेत्र यातील तफावत दूर होण्यास मदत मि ळणार असल्याचे मत तज्ञ व्यकटा करत आहेत.
    नेत्रदानाचे प्रमाण वाढावे आणि तळागाळातील गावावस्त्यांपर्यंत याबाबत जागृती व्हावी यासाठी शासनाने राज्याच्या ३३ जिल्हा रूग्णालयात ३३ समुपदेशकांची नेमणूक केली आहे. शिवाय कांही स्वयंसेवी संस्था आणि नेत्रदान चळवळीतील संस्था याबाबत सातत्याने खेडोपाड्यातून चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करत आहेत. मृताचे नेत्रपटल काढून घेण्याची व ते ताबडतोब योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठीची सामग्रीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता या कष्टांचे प्रत्यक्ष परिणाम दिसण्यास सुरवात झाली आहे असे देसाई नेत्र रूग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉ.कर्नल मदन देशपांडे यांनी सांगितले. देशपांडे व्हीजन २०२०- राईट टू साईट या संस्थेचे अध्यक्षही आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था, जागतिक आरोग्य संस्था आणि भारत सरकार या राईट टू साईट संस्थेत सहभागी आहेत.
   शासनाच्या योजनेनुसार जिल्हा रूग्णालयातून समुपदेशक नेमण्यात आले आहेत. या ठिकाणी एखादा मृत्यू घडला तर समुपदेश तसेच स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते संबंधितांच्या नातेवाईकंाना नेत्रदानाविषयी माहिती देऊन त्यांना नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करतात.नातेवाईकांची संमती मिळाली की डॉक्टर लगोलग नेत्रपटल काढून घेतात. संमती देणार्‍यांसंबंधीची माहिती स्थानिक वृत्तपत्रात छापून दिली जाते तसेच त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांतही नेत्रदानाविषयी जागृती होण्यास मदत होते. शिरूर, बारामती, नंदूरबार, उद्गीर अशा ठिकाणी यासाठी जे विशेष प्रयत्न केले गेले त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आता अनुभवास येत आहे असेही देशपांडे म्हणाले.
  राष्ट्रीय अंधनिवारण कार्यक्रमाचे उपसंचालक रमेश कथाने म्हणाले की राज्यातून वर्षाला ६५०० नेत्रपटले जमा होतात त्यातील ९० टक्के शहरी भागातून येतात. खेडोपाडी अंधश्रद्धेमुळे नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. देशाची वर्षाची गरज तीन लाख नेत्रपटलाची आहे. या वर्षात पैकी फत्त* ३८ हजार नेत्रपटल उपलब्ध होऊ शकली. आता मात्र स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न आणि शासकीय योजनांमुळे हे चित्र अधिक चांगले होण्यास मदत मिळणार आहे.

Leave a Comment