सध्या सुरू आहेत सर्वत्र विनामूल्य तीर्थयात्रा आणि संगणक वर्ग

जर्हॉ डाल डाल पर सोनेरी चिडिया करती बसेरा, हो भारत देश है मेरा ।हे हिदी पद आम्हाला लहानपणी फार आवडत असे.त्याची सध्या सकाळ दुपार आठवण होते आहे. त्या हिदी गाण्यात या देशातील समाज किती उच्च जीवनमूल्ये पाळतो आणि आपल्या शेजारी, आजूबाजूला राहणार्‍यांची सेवा करतो याचेही वर्णन आहे. सध्या पुण्यात आणि पश्चम महाराष्ट्रात पदोपदी याची प्रचीती येत आहे. कारण बहुतेक चौकात ‘काशीयात्रेला चला, अष्टविनायकाला चला, नाशिक त्र्यंबकेश्वराला चला, असे बोर्ड लागलेले दिसतात.अर्थात ही सारी तीर्थाटणे विनामूल्य असतात. काशीरामेश्वर, चारीधाम, गंगासागर, हरिद्वार, तीर्थराज प्रयाग, नया,बारा ज्योतिर्लिंग, यांच्या विनामूल्य यांत्रांचे बोर्ड चार महिन्यापूर्वी लागलेले दिसायचे. आता ते कमी झाले आहेत. आता विनामूल्य डोळे तपासणी, विनामूल्य चष्मे, विनामूल्ये दवाखाने, महिलांना साडया, मुलांला कपडे, तरुण मुलासाठी संगणकशिक्षणाचे विनामूल्य वर्ग अशा पाट्यांची संख्या मोठी आहेपुण्यात संगणकतंत्र आत्मसात करणाराला बर्‍यापैकी पगाराची नोकरी मिळते आणि गरीबांना त्यांचे प्रशिक्षण परवडत नाही अशा वेळी त्यांना विनामूल्य शिक्षण देणारी मंडळी मोठ्या संख्येने पुढे आली आहेत. असे हे दान करणारी मंडळी कोण याची चौकशही फारशी करावी लागली नाही कारण गेल्या गणपतीपासून ज्यांचे वाढदिवस जाहीरपणे साजरे झाले व ज्यांच्या वाढदिवसासाठी चौकाचौकात त्यंाची छायाचित्रे असलेले फ्लेक्स लावलेले होते तीच ही मंडळी होती.

महाराष्ट्राच्या ग्रामीणभागातील शहरात आता हे बोर्ड दिसेनासे झाले आहेत पण सहा महिन्यापूर्वी तेथेही हे बोर्ड दिसायचे. तेथे तर कार्यकर्ते घरोघर जाअून ताई, माईअक्का, यांची यादी करत, शेतीच्या कामातून कोणाला कधी सवड असेल त्यानुसार चाळीस चाळीस सीटच्या बस निघत. कधी ज्योतिबा, कधी पालीचा खंडोबा, कधी जेजुरी आणि तसेच संतांची भूमी असलेली देहू आळंदी यांच्या विनामूल्य यात्रा होत. या यात्रांतून काही कीर्तनकार आणि भजनमंडळीही असत. दोन दिवस अगदी असे आनंदात जात. परमेश्वराच्या चरणी दर्शन आणि सत्संग झाल्याने लोकांना कृतकृत्य वाटत असे आणि ही मंडळी संयोजकांना आशिर्वाद देत असत. सहा महिन्यापूर्वी तेथे चौकात चौकात दिसणार्‍या जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा असा पाट्या आता अजिबात दिसनेशा झाल्या आहेत. गेल्या वर्षी तेथे चौकात चौकात वाढदिवसांच्या शुभेच्छांचे जे प्रचंड मोठे बोर्ड दिसायचे तेही दिसेनासे झाले आहेत. पाचपाचशे लोाकंाना तीर्थयात्रा घडविणे, साडया थोतरे वाटणे, कपडे, आणि अगदी पेनड*ाईव्ह वाटणे हे सारे त्या वाढदिवसाचे शुभेच्छा मिळवणारे अचानक गायब कोठे झाले अशी चौकशी केली तेंव्हा असे कळले की, ती सारी मंडळी आता प्रत्यक्ष लोकसेवेला लागली आहेत. म्हणजे संन्यास घेतला आहे आणि सेनापती बापट, कर्मवीर  भाउराव पाटील यांच्या प्रमाणे काही काम करत आहेत असा त्याचा अर्थ नसून ती मंडळी आता नगरपालिकात निवडून गेली आहेत. निवडून गेलेली मंडळी प्रत्यक्ष कामाला गेली म्हणून तीर्थयात्रा बंद झाल्या आणि निवडणुकीत पडलेली मंडळी पडली म्हणून तीर्थयात्रा बंद झाल्या. सहा महिन्यापूर्वी वाढदिवसांच्या शुभेच्छा मिळवलेलीपुणे, पिपरी चिचवड महापालिकाक्षेत्रातील मंडळी सध्या तीर्थयात्रा, संसारात लागणारी भांडी,कुंडी, साडया, ड*ेसमटेरिअल, सायकली यांच्या वितरणात गुंतली आहेत. यातील उत्कंठेचा भाग म्हणजे या पुण्याच्या कमाईसाठी जी दहा दहा लाख रुपयांची राशी खर्च झाली ती कोठून आली हे मात्र माहीत नाही. जहॉ जहॉ डाल डाल पर सोनेरी चिडिया करती बसेरा याची प्रचीती यायचे कारण एकमेव आहे आणि ते म्हणजे नगरपालिका ,जिल्हापरिषद आणि महापालिका यांचा निवडणुकांचा महोत्सव सुरु आहे.
देशात सध्या यापूर्वी कधीही नव्हती येवढी महागाई  आहे आणि दुसर्‍या बाजूला देशात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि काळापैसा यावर नियंत्रण यावे म्हणून अण्णा हजारे, बाबा रामदेव यांची आंदोलने सुरु आहेत. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून अण्णांचे जनलोकपाल विधेयक हा राज्यकर्त्यांचाही ऐरणीवरील विषय झाला आहे. याच आठवड्यात रामदेव बाबा यांचा पुण्यात तीन दिवस मुक्काम होता या काळात त्यानीही काळ्यापैशाविरोधातील आंदोलनाची कल्पना दिली. त्यांचे आंदोलनही अण्णांच्या सारखेच प्रभावी असेल. एका बाजूला अण्णांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दुसर्‍या बाजूला रामदेवबाबा यांनाही प्रचंड प्रतिसादाची चिन्हे दिसत आहेत. या आंदोलनाचा प्रभाव पुसून टाकला जावा अशा पातळीची प्रचंड खर्चाची फुकटची तीर्थाटने अणि संगणक प्रशिक्षण केंद्रे हा सध्या येथे पदोपदी दिसणारा प्रकार आहे. महापालिकेच्या व्यवहारातूनही जेवढा पैसा उभा राहात नाही तेवढा सध्या गुंतताना दिसतो आहे. याचा फायदा फक्त गरीबच घेतो आहे असे नव्हे तर त्याचा वरचा वर्गही घरचे फर्निचर, मायक्रोवेव्ह, अशासारख्या वस्तू फुकट मिळत असतील तर त्या मिळवताना दिसत आहे
शेतकर्‍याच्या मालाला दाम मिळत नाही पण शेतीमालाची शहरातील किमत शहरातील सामान्य माणसाला न परवडणारी आहे. अजूनही येथे दहा ते पंधरा हजार रुपये मासिकप्राप्ती असणारांची संख्याच पन्नास टक्के आहे. पण आता मासिक घरभाडीच दहा बारा हजाराच्या घरात पोहोचली आहेत. गेल्या सहा महिन्यात जीवनावश्यक वस्तूंचे सरसकट भाव हे दुप्पट झाले आहेत. जी मंडळी विनामूल्य संगणक शिक्षण आणि तीर्थयात्रा घडवत आहेत ती मंडळी राजकारणातील महत्वाच्या पदासाठी ही गुंतवणूक करत असल्याचे स्पष्टच आहे. म्हणजे ते सारे दामदुपटीने वसूल करण्याचा कामाला ही मंडळी लागल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव अजून किती आकाशाला जातील याचा विचारच केलेला बरा.
-मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment