
पुणे दि.१६- लोकपालची लढाई मुंबईच्या आझादमैदानातून लढण्यासाठी २७ डिसेंबरपासून येथे उपोषणाला बसण्याची परवानगी टीम अण्णा आणि भ्रष्टाचार विरेाधी आंदोलन सदस्यांनी मुंबई पोलिसांकडे मागितली असली तरी अशी परवानगी दिली जाण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे पोलिस विभागातील सूत्रांकडून समजत. महिनाभर नाही मात्र लाक्षणिक उपोषणासाठीची परवानगी फार तर टीम अण्णाला दिली जाईल असेही या सूत्रांनी सांगितले.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार आझाद मैदान परिसराजवळ अनेक महत्त्वाच्या इमारती असून त्यात दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. मैदानाजवळ पालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मंत्रालय, विधानभवन अशा महत्त्वाच्या इमारती आहेत. त्याचबरोबर २७ डिसेंबर म्हणजे नाताळचे दिवस. सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ल्यांचा धोका अधिक असतो. त्यामुळे या मैदानावर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि त्यांनी महिनाभर तेथे तळ ठोकला तर पोलिस यंत्रणांवर कमालीचा ताण येणार आहेच पण कायदा सुव्यवस्थेचाही मोठा प्रश्न मिर्माण होणार आहे. टीम अण्णाने दिल्लीतील थंडी अण्णांना सोसणार नाही या कारणास्तव हा लढा मुंबईतील आझाद मैदानावर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून भ्रष्टाचार विरेाधी समितीचे सदस्य प्रफुल्ल वोरा यांनी पोलिस विभागाकडे या आंदोलन आणि उपोषणासाठीची महिनाभराची परवानगी मागितली आहे. त्यांनी पोलिस प्रमुखांशी चर्चाही केली आहे. मात्र पोलिस विभागाने अद्याप तरी त्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. अर्थात २७ डिसेंबरपूर्वी टीम अण्णाला या बाबतचा निर्णय कळविण्यात येणार आहे असेही या सूत्रांकडून समजले.