सार्वजनिक बँकांत पाच लाख नोकर्‍या उपलब्ध

मुंबई,दि.१३ डिसेंबर- नव्याने पदवीधर झालेल्या किवा नव्याने बँकिग व्यवसायात येवू इच्छिणार्‍यांसाठी पुढील काही काळ चांगला जाणार आहे. सरकारी बँकांत पाच लाख नव्या नोकर्‍या उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भरती युनियन बँक व पंजाब नॅशनल बँक येथे होणार आहे. बीएनपी पारिबास, नोमुरा, बार्कलेज यांच्यासह अन्य काही वित्तसेवा देणार्‍या कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरूवात केली आहे, असे असताना सरकारी बँकांनी मोठ्या प्रमाणात नवे मनुष्यबळ घेण्याचा संकल्प केला आहे.
चालू महिन्याच्या अखेरपर्यंत देशभरातून ४४ लाख उमेदवार बँकिग परीक्षांना बसतील. या परीक्षा पुढील चार महिन्यांत भरण्यात येणार्‍या एकूण ५० हजार जागांसाठी घेतल्या जाणार आहेत. यापूर्वी देशात १०.५ लाख उमेदवारांची बँक अधिकारी पदासाठी परीक्षा घेतली होती. गेल्या दहा वर्षांत स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा यांनी मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केली. सक्तीची निवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती अशा अनेक मार्गांनी बँकांनी आपला कर्मचारी आकार कमी केला. यामुळे या बँकांचा प्रति कर्मचारी व्यवसाय २०११ या चालू वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढून १० कोटी रूपये झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. हाच व्यवसाय २००५ मध्ये प्रति कर्मचारी ९.८ कोटी रूपये होता. गेल्या १० वर्षांत सुमारे दोन लाख पदे रिक्त झाली. सरकारी बँकांनी शाखा विस्तार सुरू ठेवला व त्याचवेळी या बँकांतून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग निवृत्त झाला. यामुळे आता या बँकांना कमचार्‍यांची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पाच लाख लोकांना सरकारी बँका नोकरी देतील, असा अंदाज अन्र्स्ट अॅण्ड यंग या कंपनीने वर्तविला आहे.

Leave a Comment