कापूस,सोयाबीन परिषदेत खा.राजु शेट्टींनी दिला सरकारला अल्टीमेटम

बुलडाणा (प्रतिनिधी)-कापूस,सोयाबीन आणि धानाला वाढीव हमीभाव प्राप्त करुन घेण्यासाठी विधान सभेच्या नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल करण्यासाठी तसेच रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्यासाठी सज्ज रहा. वाढीव हमीभाव घेऊनच घरी परत जाण्याच्या तयारीने या असे जाहीर आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार राजु शेट्टी यांनी केले. त्यासाठी ८ डिसेंबर रोजी संत गाडगेबाबांची पुण्यभुमी असलेल्या संतनगरी गुरुकुंज मोझरी येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात उपस्थित रहा. त्याठिकाणी आंदोलनाची सविस्तर रणनिती जाहीर करण्यात येईल असाही इशारा राजु शेट्टी यांनी दिला.
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाणा येथे आज २७ नोव्हेंबर रोजी दुपारी आयोजित कापूस,सोयाबीन परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते. संघटनेचे नेते सदाभाऊ खोत,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा देशपांडे,सत्तारभाई पटेल,प्रांताध्यक्ष दशरथभाई सावंत,लखनौ विद्यापीठाचे प्रोफेसर सुधीर पवार,जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीकारक शहीद भगतसिग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर व्यासपीठावरील सर्व नेत्यांना शेतकर्‍यांचे हत्यार असलेले रुह्मणे देऊन सत्कार करण्यात आला.
    केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या आणि दिशाभुल करणार्‍या कृषी धोरणामुळेच शेतकर्‍यांना हमीभाव मिळत नाही असे सांगुन सरकारवर घणाघाती टिका केली. उत्पादन खर्च काढणार्‍या कृषी मुल्य आयोगाने कशी दिशाभुल करणारी आकडेवाडी लिहून शेतकर्‍यांची दिशाभुल केली आहे हे स्पष्ट करुन राजु शेट्टी यांनी सरकारला आणि राज्यकर्त्यांना गंभीर इशारा दिला. ते पुढे म्हणाले की खासदार आणि आमदारांचे वेतन दुपटीने वाढविण्यासाठी आणि कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग देण्यासाठी तसेच मद्यसम्राट विजय मल्यांला आर्थिक पॅकेज देण्यासाठी केंद्र सरकारजवळ कोट्यावधी रुपये आहेत. मात्र हजारोंच्या संख्येने आत्महत्या करणार्‍या गरीब शेतकर्‍याच्या उत्पादीत शेतमाला हमीभाव देण्यासाठी पैसे नाहीत. हि बाब संतापजनक  आहे. त्यामुळे हमीभाव घेण्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी ठेवा तरच कापसाला व सोयाबीनला निश्चीत मिळेल असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून व्यत्त* केला. ८ डिसेंबरपर्यंत शासनाने हमीभाव जाहीर केला नाहीतर ८ डिसेंबर रोजी मोझरी येथे होणार्‍या भव्य शेतकरी मेळाव्यात सरकारच्या विरोधात उग्र आंदोलन कशाप्रकारे छेडण्यात येईल. याची जाहीर घोषणा करण्यात येईल.
    या कापूस,सोयाबीन परिषदेत ठराव घेण्यात आले. त्या ठरावांमधे शेतमालाचे आयातनिर्यात धोरण शासनाने त्वरीत जाहीर करावे, हमीभावाची जबाबदारी राज्य सरकारने स्विकारावी,महागाईची व्याख्या करावी,नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत देतांना मदतीचे धोरण जाहीर करावे,साखर निर्यात करता त्याप्रमाणे कापूस निर्यात करण्याची घोषणा करा आदी ठराव परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. राज्य व केंद्र सरकारने कापूस निर्यात करण्याचे धोरण जाहीर केले तर कापसाचा हमीभाव आपोआपच वाढेल असा विश्वासही त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला. यावेळी रविकांत तुपकर,सदाभाऊ खोत,सत्तार पटेल,वर्षा देशपांडे आदींचीही सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टिका करणारी भाषणे झाली.
    खा.राजु शेट्टी यांचे भाषण सुरु असतांनाच भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार चैनसुख संचेती अचानकपणे सभामंचावर स्थानापन्न झाले. शेट्टी यांचे भाषण संपताच आ.संचेती यांनी जाहीर केले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला भाजपाचा जाहीर पाठींबा असल्याची घोषणा केली. या परिषदेला कोल्हापूर,लातुर,यवतमाळ,जालना, अकोला,पुणे आदी ठिकाणच्या नेत्यांसह हजारोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment