अण्णा हजारेंच्या नावाने राजकीय पक्ष काढणार्‍या नाशिकच्या उद्योगपतीविरूद्ध कायदेशीर कारवाई

पुणे दि.२४- अण्णा हजारे यांच्या नावाने राजकीय पक्ष काढणार्‍या नाशिकच्या उद्योगपतीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय टीम अण्णांनी घेतला असून त्याबाबतची नोटीस पुढील आठवड्यात पाठविली जाणार असल्याचे समजते. अण्णांचे कायदा सल्लागार अॅडव्होकेट मिलींद पवार यांनी कायदेशीर कारवाईचा निर्णय मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले.
याविषयीची हकीकत अशी की नाशिक येथील व्यावसायिक दत्ताजी वाघ यांनी तीन दिवसांपूर्वी स्थानिक वर्तमानपत्रात राष्ट्रीय हजारो अण्णा पार्टी नावाचा पक्ष स्थापन केल्याचे व त्यासाठी सभासद नोंदणी सुरू असल्याचे जाहीर केले आहे. अण्णांनी स्वतः कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या नावाचा अथवा फोटोचा वापर करू नये असे बजावले आहे मात्र वाघ यांचे म्हणणे असे आहे की मीही अण्णांप्रमाणेच भ्रष्टाचारविरोधात लढतो आहे. आमचा दोघांचा उद्देश एकच असल्याने अण्णा आक्षेप घेणार नाहीत. अण्णा स्वतःच राजकीय पक्ष स्थापन करणार असतील तर मी माझा पक्ष त्यांच्या पक्षांत विलीन करण्यास तयार आहे. वाघ यांनी रीतसर निवडणूक आयोगाकडे नवीन पक्षासाठी लागणारी कागदपत्रे दाखल करून पक्षांची स्थापना केली आहे व तशी नोटीसही जारी केली आहे.मात्र पक्षाचे निवडणूक चिन्ह अजून ठरले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाघ यांनी स््थानिक वर्तमानपत्रात केलेल्या आवाहनाला पाच हजार जणांनी प्रतिसाद दिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि नाशिक महापालिकेच्या सर्व १२२ जागा लढविण्याची त्यांची तयारी आहे.
अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन समितीचे अध्यक्ष के.टी.पवार यांनी मात्र या पक्षाच्या नावाला आक्षेप घेतला आहे. अॅडव्होकेट मिलींद पवार यांनी वाघ यांच्या पक्षाचा आणि अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन समितीचा कांहीही संबंध नसल्याची जाहीर नोटीस वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात येत असल्याचे व या पक्षाबाबत अण्णा कोणत्याही प्रकाराला जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment