
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २००८ साली केलेल्या, आपल्या दृष्टीने लाजीरवाण्या ठरलेल्या दहशतवादी हल्ल्याला आज तीन वर्षे पूर्ण झाली.पण अजूनही आपले सरकार असा हल्ला नंतर कधीच होणार नाही याची शाश्वती आपल्याला देऊ शकत नाही.मग आपण या हल्ल्यापासून काय शिकलो असा प्रश्न निर्माण होतोच.खरे तर सरकारला या पासून काही शिकायचेच असते तर त्यासाठी दर एक दोन वर्षाला सरकारला दहशतवादी संघटनांनी एक मोका दिलेला होताच. अगदी १९९० सालपासून आपल्या देशावर असे हल्ले सुरू झाले आहेत आणि आपल्या गुप्तचर व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि सरकार या सर्वांचे वस्त्रहरण झाले आहे. शिकायचेच असते तर यातल्या कोणत्याही प्रकारातून सरकारला काही तरी शिकता आले असते आणि सरकारने सारी व्यवस्था अशी सक्त केली असती की नंतर कधी या देशावर हल्ला झाला नसता. सरकारने अशा प्रकारांतून काही शिकायचे नाही असे ठरवलेच आहे. सुरक्षा व्यवस्थांतला घोळ, गाफीलपणा संपावयाचा सरकारचा निर्धारच नाही. भारतात किती हल्ले झाले पण त्यातल्या आरोपींची यादीही आपल्याला अचुकपणे देता येत नाही. असे एकदा नव्हे तर दोनदा दिसून आले. जे आरोपी भारतात पोलिसांच्या डोळ्या देखत फिरत आहेत त्यांचीच नावे पाकिस्तानात फरार झालेल्या आरोपींच्या यादीत दिली. याही बाबतीत एकदा चूक झाल्यावर ती दुरुस्त करण्यात आली नाही.