राळेगणचा राडा

केंद्रीय कृषी मंत्री मा. शरदराव पवार यांच्यावर काल हल्ला झाला.त्याच्या प्रतिक्रिया देशभर उमटल्या.राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातल्या पक्ष असल्याने या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काल हा प्रकार झाला.पण,आता या निमित्ताने राळेगण सिद्धी गावात राडा सुरू झाला आहे.सध्या कोणत्याही घटनेबाबत अण्णांना काय वाटते याला महत्त्व आले आहे.कारण ते जनांदोलनाचे नेते बनले आहेत. तेव्हा त्यांनी आपले बोलणे आणि वागणे यावर नियंत्रण ठेवण्याची आणि त्याबाबत गांभीर्याने वागण्याची गरज आहे. तसे गांभीर्य त्यांनी ठेवले नाही.केन्द्रीय मंत्र्याला मारहाण होतेय हा प्रकार काही साधा नाही. ते अण्णांचे  अगदी कट्टर शत्रू आहेत असे मानले तरीही अण्णांना या मारहाणीचा आनंद होता कामा नये.कारण ही थप्पड कधी अण्णांच्याही गालावर बसू शकते. पण त्यावर तेवढा विचार न करता त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नको होती. पवारांना कोणातरी माथेफिरूने हल्ला केलाय यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारल्यावर मनात आले ते भकून चालणार नाही. आपण हा प्रकार स्वतः टीव्हीवर पाहू असे म्हणून त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया देणे टाळायला हवे होते.    
    आपली यावरची प्रतिक्रिया कशी असायला हवी आणि तिच्यातून आपला उमदेपणा कसा दिसेल यावर विचार करायला एखादा मिनिट घेतला असता तर काही बिघडले नसत. पवारांच्या अंगावर पडलेला हात आपल्यावर पडला असता तर आपल्याला काय वाटले असते याचा विचार करून मग अण्णांनी बोलायला हवे होते. आधी त्यांनी चुकीची प्रतिक्रिया दिली आणि नंतर दिलगिरी व्यक्त करून झाला प्रकार चुकीचा असल्याचे मत मांडून सारवा सारवी केली. घडलेल्या घटनेचे गभीर्य पटकन लक्षात न येणे हा नेत्यांसाठी अवगुण ठरत असतो. अण्णांच्या या प्रतिक्रियेने हे दिसून आले आहे आणि हा सारा प्रकार इतिहासात नोंदला गेला आहे. आधी चेष्टा करून नंतर सारवासारवी केली पण शब्दाचा बाण एकदा बसला तो बसलाच. सारवासारवीने या बाणाचा घाव कधी भरून येत नसतो. या प्रकारात अण्णांचा परिपक्वपणा दिसून आला पण या प्रकारानंतर खुद्द पवारांना आणि नंतर राष्ट*वादीच्या काही कार्यकर्त्यांना संयम राखता आला नाही. आपल्यावर झालेल्या या हल्ल्याची कार्यकर्त्यांनी फार दखल घेऊ नये असे काल आवाहन करणारे पवारही अण्णांच्या प्रतिक्रियेवर आपली प्रतिक्रिया नदवू बसले.
    आपल्याला नवा गांधीवाद समजला असे पवार म्हणाले. काल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम पाळायचे आवाहन केले होते तरीही त्यांनी ते आवाहन न मानता आपला राग वेडावाकडा व्यक्त केलाच. आता तर पवारांनीच  सिग्नल दिला. मग नगर जिल्ह्यातले कार्यकर्ते सरळ आत्मक्लेषा साठी राळेगण सिद्धीला निघाले. तिथे त्यांना  यादव बाबांच्या मंदिरासमोर बसूनच आत्मक्लेष भोगायचा होता. आपल्या आपल्या घरी बसून त्यांना तो भोगता आला असता पण आपण पवार साहेबांसाठी काही तरी अचाट काम करू शकतो हे दाखवण्यासाठी ही निष्ठा प्रदर्शनाची दिडी राळेगणला निघाली. बबनराव पाचपुते यांनी तर आपण तिथे काहीही करणार नव्हतो, अण्णांना भेटून, झाले गेले विसरून जा, असे म्हणणार होतो असे पाचपुते म्हणाले पण काय झाले गेले आणि काय विसरायचे होते हे काही कळले नाही. आजकाल राळेगणला येणारांची रीघ लागली आहे.काही निमित्ताने राळेगणला चक्कर टाकली की बातमीत नाव येते. तेव्हा हेही निघाल. अण्णा असं का बोललात म्हणून विचारायला. खरे तर अण्णा जे काही बोलले ते चुकीचे होते आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती. मग आता अण्णांचा निषेध करण्याचे आणि त्यांना जाब विचारण्याचे कारणच काय होते ?
    राळेगणच्या लोकांचे हेच मत होते. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. त्यांनी राळेगणध्ये आंदोलन करणार अशी कल्पना पोलिसांना दिलेली नव्हती. त्यामुळे तिथे पोलीस बंदोबस्त नव्हता त्यामुळे झटापट झाली. या प्रकाराने आता तो माथेफिरू राहिला दूर. अण्णा आणि राळेगणवासीयांत जुंपली आहे.  अण्णांनी आता पुन्हा प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीला  प्रश्न केला आहे. पवारांवर हात पडला की राग येतो मग  मावळच्या शेतकर्‍यांवर गोळ्या झाडल्या जातात तेव्हा असा  राग का येत नाही. प्रतिक्रिया आणि अभिप्राय यांनी प्रकरण वाढते, त्यातून नवे वाद निर्माण होतात. त्यात काही लोक आपले राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करतात म्हणून पवारांनी आणि सुप्रिया सुळे यांनी कालच प्रतिक्रिया व्यक्त करू नका असे आवाहन केले होते. त्यामागचा हेतू हाच होता. काँग्रेसच्या नेत्यांनीही आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला महागाईमुळे झाला आहे आणि त्याला यशवंत सिन्हा यची फूस आहे असा नवा शोध काँग्रेसने लावला आहे. खरे तर महागाईशी पवारांचा काही संबंध नाही. उलट राहूल गांधी यांनीच पूर्वी महागाईसाठी पवारांना जबाबदार धरणारे विधान कले होते हे काँग्रेसच्या  नेत्यांना आठवत असेलच.

1 thought on “राळेगणचा राडा”

Leave a Comment