उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

पुणे, दि.२०(प्रतिनिधी)-कोणतीही भाषा असो…तिची आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेली असते. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे अस्तित्व कायम टिकवून ठेवण्यासाठी भाषा जिवंत ठेवणे आवश्यक आहे. असे मत पहिल्या उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मुमताज पीरभॉय यांनी व्यक्त केले.उर्दू साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने एक दिवसीय महिला संमेलनाचे आझम कॅम्पसमध्ये आयोजन केले होते यावेळी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. . ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्षा व डे*क्कन मुस्लीम इन्स्टि्यूटच्या अध्यक्षा आबेदा इनामदार, महाराष्ट* साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी, नगरसेवक आरिफ बागवान, श्रीकांत पाटील, आझम ट*स्टचे अध्यक्ष मुनव्वर पीरभॉय, काजी मुश्ताक अहमद आदी उपस्थित होते.
पीरभॉय त्या म्हणाल्या,‘ मातृभाषेमध्ये शिक्षण देणार्‍या शाळा कमी होत असल्यामुळे आता मातृभाषा संपण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे आता पुढच्या पिढीला मातृभाषेचे बाळकडू पाजले पाहिजे.’  काकडे म्हणाल्या,’ अनुवाद ही माझ्यासाठी आकलन प्रक्रियाच आहे. यातून स्वतंत्र साहित्य निर्मिती करण्यास वाव मिळतो.’स्त्रियांना सध्या बोलण्याची संधी मिळते. पण स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाल्यास त्या खुलेपणाने व्यक्त होतील. त्यामुळे स्त्रियांसाठी वेगळे साहित्य संमेलन असावे, असे मत काकडे यांनी यावेळी व्यक्त केले.
संमेलनाच्या निमित्ताने सिद्दीकी कहकशां यास्मीन, विद्या पटवर्धन यांना ’फातिमा बीबी पुरस्कार’ , रफिया शबनम आबिदी, डॉ. वैद्य यांना ’कुर्रतुल-ऐन हैदर पुरस्कार’ , सुरैय्या सौलत हुसेन, मंगला गोडबोले यांना ’इस्मत चुगताई पुरस्कार’ , सादिका नवाब सहर, अंजली कुलकर्णी यांना ’परवीन शाकिर पुरस्कार’ आणि अकिला सय्यद यांना ’आबिदा इनामदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काजी मुश्ताक अहमद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी उद्धव कानडे यांनी केले.

Leave a Comment