गडाफीचा फरारी मुलगा अखेर सापडला

त्रिपोली, दि.२०नोव्हेंबर-लिबियाचा एकेकाळचा सर्वेसर्वा मुअम्मर गडाफी याचा मोठा मुलगा सईफ अल इस्लाम याला पकडण्यात अखेर नॅशनल ट*ान्झिशनल कौन्सिल सरकारला यश आले आहे. सईफ याला एकेकाळी मुअम्मर गडाफीला वारसदार मानले जात होते. ३९ वर्षीय सईफ याला तीन महिन्यांच्या शोधानंतर पकडण्यात यश मिळाले आहे. दक्षिण लिबियामध्ये तो सापडल्याचे एनटीसीचे कायदा मंत्री मोहम्मद अल् अलगुई यांनी सांगितले.
मुअम्मर गडाफीचा खातमा झाल्यानंतर गडाफी कुटुंबियातील सईफ हाच एकमेव वरिष्ठ सदस्य उरला होता. त्याला पकडण्यात आल्याने गडाफीचे साम्राज्य आता पूर्णपणे अस्तंगत झाले आहे, असे अलगुई यांनी नमूद केले. एबारी प्रांतात सईफला त्याच्या तीन साथीदारांसह पकडण्यात आले. राजधानी त्रिपोलीपासून हे ठिकाण १७० कि. मी. वर आहे. अल्जेरिया आणि नायगर पट्ट्यात पळून जाण्यासाठी हे ठिकाण जवळचे आहे. सईफला आंतरराष्ट*ीय कोर्टाकडे सुपूर्द करायचे की, त्याचा फैसला लिबियातच करायचा, याचा निर्णय अंतरीम सरकार लवकरच करणार असल्याचे अलगुई यांनी सांगितले.

Leave a Comment