लालकृष्ण अडवानींच्या जनचेतना यात्रेचा समारोप

नवी दिल्ली,दि.२० नोव्हेंबर- भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या जनचेतना यात्रेचा रविवारी रामलीला मैदानावर समारोप झाला. जनचेतना यात्रा संपली असली तरी भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरुच राहणार असल्याचे अडवानी यांनी रामलीला मैदानावर झालेल्या विशाल जनसभेत सांगितले. भाजपाप्रणित एनडीए आघाडीचे आठ प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
गेल्या साठ वर्षांच्या राजकारणात पहिल्यांदाच आपल्याला लोकांचा इतका मोठा पाठिबा मिळाल्याचे सांगून अडवानी पुढे म्हणाले की, आतापर्यंत आपण सहा यात्रा केल्या आहेत. पण जितका प्रतिसाद या यात्रेला मिळाला, तितका प्रतिसाद अन्य कोणत्याही यात्रेला मिळालेला नाही. तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांतदेखील आपल्या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जनचेतना यात्रेदरम्यान ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची उणीव मात्र जाणवली. भ्रष्टाचार तळागाळापर्यंत पसरलेली वेल असून तिचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. भ्रष्टाचारात अडकलेले अनेक मंत्री तिहारच्या तुरुंगात गेले, पण केंद्र सरकारवर तिचा काहीही परिणाम झाला नाही. यात्रा संपली असली तरी भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरुच राहील. जयप्रकाश नारायण यांचे जन्मगाव असलेल्या सिताब दियारा येथून अडवानी यांनी ११ ऑक्टोबरला जनचेतना यात्रेला सुरुवात केली होती. २२ राज्ये आणि १५ केंद्रशासित प्रदेशांतून ही यात्रा गेली.

Leave a Comment