‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’

पुणे, दि.१८- किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरुच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या आणि देश-विदेशातील अभिजात संगिताच्या रसिकांसाठी संगीत पंढरी ठरलेला स्वरयज्ञ ‘सवाई गंधर्व महोत्सवाच्या’ नावात आता स्वरभास्कर पं. भिमसेन जोशी यांचे नाव जोडण्यात आले असून हा महोत्सव  यावर्षीपासून  ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ अशा नावाने ओळखला जाणार आहे. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत दिली.
प्रसिद्ध नाटककार, लेखक श्रीरंग गोडबोले, आनंद जोग, सी. शिवानंद आदी यावेळी उपस्थित होते.  जोशी म्हणाले, मागील ५८ वर्षापासून पंडित भीमसेन जोशी यांनी आपले गुरु रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ ची सुरुवात केली आणि गुरुभत्त*ीचे मूर्तीमंत उदाहरण घालून दिले आहे. ते या महोत्सवाचे प्राण आहेत. यंदा पंडितजी  आपल्यात नसले तरी त्यांचे अस्तित्व ठळकपणे अधोरेखीत करण्यासाठी  महोत्सवाच्या वतीने पंडितजींना श्रद्धांजली म्हणून ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’असे महोत्सवाचे नामकरण करण्यात आले आहे. अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी संध्याकाळची वेळ उत्तम वाटते यामुळे यंदा प्रायोगिक तत्वावर सकाळचे सत्र रद्द करण्यात आले आहे तसेच महोत्सव पाच दिवसांचा करण्यात आला आहे असे जोशी यांनी सांगीतले.
येत्या ७ ते ११ डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला मैदान येथे होणार आहे. ७ डिसेंबर रोजी महोत्सवाची सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने होईल. त्यानंतर  संजय गरुड यांचे शास्त्रीय गायन, पं.सतीश व्यास यांचे संतुर वादन, पं.अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन आणि समारोपात पं.अजय पोहनकर यांचे गायन होणार आहे. ८ डिसेंबर रोजी सत्राची सुरुवात महेश काळे आणि शैला दातार यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर पं.रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन तर दक्षिणेकडे सॅक्सोफोन चक्रवादी म्हणून ओळखले जाणारे कद्री गोपालनाथ सॅक्सोफोनद्वारे  हिदुस्तानी आणि कर्नाटक सहवादन हे या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. तसेच याच दिवशी जेष्ठ गायक डॉ.बालमुरलीकृष्ण यांचे गायन ऐकावयास मिळणार आहे ते बर्‍याच वर्षां नंतर सवाई मध्ये गाणार आहेत.
९ डिसेंबर रोजी  पुणेकरांना पहिल्यांदाच प्रसिद्ध  गायक, संगितकार शंकर महादेवन यांच्या कर्नाटकी शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेण्यात येणार आहे. तसेच महादेवन यावेळी पंडितजींच्या काही  रचनाही सादर करणार आहेत. तसेच कुमार मर्डुर यांचे गायन, कार्तीक शेषाद्री यांचे सतारवदन आणि पं. जसराज यांच्या गायनांचा अस्वाद मिळणार  आहे. १० डिसेंबर रोजी योजना शिवानंद, श्रीनिवास जोशी आणि पं. मालिनी राजुरकर यांचे गायन, नृत्यनिकेतन उडपी संस्था भरतनाट्यम् तर शमा भाटे यांची नादरुप संस्था कथ्थक शैलीत ‘साकार-निकार’ या नृत्याविष्काराने भीमसेनजींना  आदरांजली अर्पण करणार आहेत.  या दिवसाचा शेवट जगप्रसिद्ध सरोदवादक उ. अमजद अली खाँ यांच्या सरोदवादनाने होणार आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सवाई गंधर्वांच्या  नातसून पद्मा देशपांडे, पं. माणिक वर्मा यांचे भाचे ओंकार दादरकर, डॉ. नागराज राव हवालदार, पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन, डॉ.एन.राजम यांचे व्हायोलीन वादन सादर होणार आहे. तर महोत्सवाच्या समारोप किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका प्रभा आत्रे यांचे गायनाने होणार आहे. महोत्सवात पाचही दिवस संध्याकाळच्या सत्रात कार्यक्रम होणार असून त्याची वेळ ४ ते १० अशी असणार आहे. मात्र महोत्सवाच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशीचे कार्यक्रम दुपारी साडेतीन वाजता सुरु होणार आहेत.  महोत्सवाची तिकीटे १ डिसेंबर पासून उपलब्ध होणार आहेत असे जोशी यांनी सांगितले. 

Leave a Comment