
मानवाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे, परंतु अजून सुद्धा त्याच्यासाठी या सृष्टीतील काही गोष्टी गूढ राहिलेल्या आहेत.बाह्यसृष्टी तर दूरच पण मानवी शरीर हे सुद्धा त्याच्यासाठी अजून बर्याचअंशी कोडे बनून राहिलेले आहे. त्यातल्या त्यात मेंदूचे विकार आणि कर्करोग यांच्या समोर माणसाने हात टेकलेले आहेत. कर्करोग हा मानवाचा शत्रू झालेला आहे. मात्र तो होतो कसा, याचे कारण अजून समजलेले नसल्यामुळे त्यावर प्रभावी औषध शोधून काढण्यात यश आलेले नाही. कर्करोगाच्या पहिल्या अवस्थेत त्याचे निदान झाले तर तो काही प्रमाणात दुरुस्त करता येतो आणि सदर रुग्ण बरीच वर्षे जगूही शकतो. काही कर्करोगांच्या बाबतीत दुसर्या अवस्थेत सुद्धा इलाज करता येतो. परंतु तो प्रगत अवस्थेत आल्यानंतर तो कर्करोग म्हणजे मृत्यूचे निमंत्रणच ठरते. काही कर्करोगांच्या बाबतीत पहिल्या आणि दुसर्या अवस्थेत कसलाच त्रास जाणवत नाही आणि थोडा त्रास जाणवायला लागतो तेव्हा तो कर्करोग तिसर्या किवा चौथ्या अवस्थेत गेलेला असतो आणि अशा अवस्थेत त्यावर इलाज करणे मोठेच दुरापास्त ठरते. काही इलाज केलाच तर त्या इलाजाचे अन्य परिणाम फारच भयानक असतात.
आपल्या शरीरातल्या एखाद्या अवयवाच्या पेशी नियंत्रणाच्या बाहेर वेगाने वाढायला लागतात. अशी पेशींची अमर्याद वाढ म्हणजेच कर्करोग एवढे आता समजलेले आहे. त्याच्या कारणांविषयी बर्यापैकी जाणीव झालेलीही आहे. परंतु या पेशी अशा का वाढायला लागतात याचे नेमके कारण अजून शोधता आलेले नाही. त्यामुळे कोणत्याच प्रकारचा कर्करोग होऊ नये, असे एखादे प्रतिबंधात्मक इंजेक्शन किवा गोळी तयार करण्यात आलेली नाही. सध्या कर्करोगावर करावयाच्या इलाजाच्या संदर्भात जे काही संशोधन सुरू आहे ती पेशींची वाढ कशी रोखता येईल यावरच सुरू आहे. गेल्या २५ वर्षांपासून या संशोधनाला खूप गती आलेली आहे. अधूनमधून कोणी तरी औषध सापडल्याचा दावा करतो, परंतु काही दिवसांनी त्या दाव्यात काही तरी दोष आहे असे आढळते आणि ते संशोधन तिथेच थांबते. आता मात्र अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या विद्यापीठातील संशोधकांनी कर्करोगावर हमखास इलाज शोधला असल्याचा दावा केला आहे. केजी-५ नावाचे औषध शोधून काढण्यात आले असून ते कर्करोगाच्या बर्याच प्रकारांवर गुणकारी ठरेल, असा विश्वास या संशोधकांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारची औषधे शोधून काढली जातात तेव्हा त्याचा पहिला प्रयोग उंदरांवर केलेला असतो. तो तत्वतः उपयुक्त ठरला की, तो जाहीर केला जातो. कारण त्यातून आशावादी संदेश जात असतो.
प्रत्यक्षात ते औषध तयार होऊन बाजारात यायला बरीच वर्षे लागत असतात. कारण नंतरच्या चाचण्या माणसांवर कराव्या लागतात आणि त्या टप्प्याटप्प्याने करण्यामध्ये बरेच दिवस जातात. म्हणून औषधांचा शोध जाहीर झाला की, ते औषध प्रत्यक्षात वापरात येण्यास दहा ते बारा वर्षांचा कालावधी जात असतो. परंतु केजी-५ हे जे नवे औषध शोधण्यात आले आहे ते अवघ्या पाच वर्षांत उपलब्ध होईल, असे सांगण्यात आलेले आहे. या औषधाचे वैशिष्ट्य असे की, ते कर्करोगाच्या पेशींची वाढच होऊ देत नाही. त्याची वाढ ते रोखून धरते. आपली वाढ कोणी तरी रोखून धरत आहे हे त्या पेशींच्या लक्षात आले की, त्या पेशी आत्महत्या करतात आणि पुन्हा म्हणून त्या अवयवांमध्ये दिसत नाहीत असे या संशोधकांना आढळले आहे. या औषधाचे कसलेही दुष्परिणाम शरीरावर होणार नाही अशीही खात्री या संशोधकांनी दिली आहे. सुरुवातीच्या काळात तरी त्यांनी स्तन, मूत्रपिड आणि स्वादूपिड यांच्या कर्करोगांवर हे औषध उपयुक्त ठरेल, अशी १०० टक्के खात्री दिली आहे. आजवर कर्करोगावर अंशतः इलाज करणारी काही औषधे शोधण्यात आलेली आहेत. त्यामुळे कर्करोग पूर्ण दुरुस्त करूच असा दावा केला जात नाही, पण ही औषधे ज्या पद्धतीने शोधली गेली आहेत त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हे नवे औषध शोधलेले आहे. सध्याचा जमाना जैवतंत्रज्ञानाचा आहे आणि हे तंत्रज्ञान जनुके आणि त्यातील प्रथिने यांच्या रचनेवर भर देऊन शोधले जात असते.
या संशोधकांनी याच पद्धतीने हे औषध शोधलेले आहे. कर्करोगाची वाढ करणार्या पेशींची रचना नेमकी कशी आहे, याचा या लोकांनी अभ्यास केला आहे. कर्करोगांच्या पेशी एका विशिष्ट प्रथिनांमुळे झपाट्याने वाढत असतात. म्हणजे हे प्रथिन त्या पेशीमध्ये काही विशिष्ट रासायनिक प्रक्रियेच्या अंती निर्माण झाले की, ते प्रथिन पेशींच्या वाढीला वेग द्यायला लागते. ही वेग देण्याची प्रक्रिया काय आहे हे या सशोधकांनी जाणून घेतले आणि एक असे प्रथिन तयार केले आहे की, जे ही प्रक्रियाच बदलून टाकते. ती प्रक्रिया बदलून गेली की, पेशींची वाढ रोखली जाते. या दृष्टीने जेव्हा प्रयोग करण्यात आले तेव्हा या नव्या प्रथिनाचे परिणाम इतके प्रभावी असल्याचे लक्षात आले की, या संशोधकांना आश्चर्य वाटले. या परिणामकारी प्रथिनाला केजी-५ असे नाव देण्यात आलेले आहे. या प्रथिनाची चाचणी प्राण्यांवर करण्यात आलेली आहे, पण ती अजून माणसावर केलेली नाही. माणसाच्या पेशींवर मात्र ती केली गेली आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाच्या पेशी एका बशीत घेऊन त्यावर हे केजी-५ टाकले की त्या पेशींची वाढ रोखली गेली. याचा अर्थ औषधाची मानवावरची प्राथमिक चाचणी झालेली आहे. आता अधिक प्रगत चाचण्या केल्या जातील आणि त्या अठरा महिने चालून पुढच्या प्रक्रिया पूर्ण करून हे औषध पाच वर्षात बाजारात येईल.