आपल्या देशात लोकांना काही चांगले सांगितलेलेही आवडत नाही आणि त्यामुळे त्यांना कोणी काही सांगायच्या भानगडीतही पडत नाही.नेते तर जनतेला फार घाबरून असतात.त्यामुळे ते जनतेला काही शिकवण्याच्या नादाला लागत नाहीत. लोकांची नाराजी ओढवून घेऊन त्यांच्या मतांना मुकणे त्यांना मानवत नाही. तेव्हा जनतेच्या हिताचे असो वा नसो तिला आवडेल ते बोलावे हे बरे असे त्यांचे धोरण असते. स्वातंत्र्यापूर्वी आपले नेते जनतेचे प्रबोधनही करीत असत पण ही प्रबोधनाची परंपरा आता बंद झाली आहे. आता कोणताही राजकीय पक्षाचा नेता कुटुंब नियोजनावर बोलत नाही, हुंडा घेतलेल्या लग्नाला हजेरी लावतो, अंधःश्रद्धांबद्दल मौन बाळगतो, धार्मिक उन्मादाबद्दल बोलण्याची तर हिमतच करीत नाही. दारू पिणारांना तो खडसावत नाही कारण त्यामुळे लोक नाराज होतील अशी भीती त्याला वाटत असते.केन्द्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमश हे मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.
त्यांनी भारत हा गलिच्छ देश असल्याचे स्पष्ट म्हटले आहे आणि या घाणेरडेपणाला स्वतः भारतीयच जबाबदार आहेत असे खडसावले आहे. आपल्याला फार घाण सवयी आहेत. आपण आपले घर स्वच्छ करतो पण घरातली घाण रस्त्यावर आणून टाकतो. गावागावात लोकांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या ठेवलेल्या असतात पण आपण सारे लोक नेमकी ती कुंडी सोडून इतरत्रच कचरा टाकत असतो. चार पावले पुढे चालून नेमका कचरा कुंडीत टाकला तर आपले काही तरी लाख दोन लाखाचे नुकसान होईल असे त्यांना वाटत असावे. त्याचे आपल्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात याची त्यांना अजीबात जाणीव नसत. अनेक सरकारी कार्यालयात विशेषतः जिथे तंबाखू खाणारे लोक जात येत असतात तिथे ते नेम धरून दरवाज्याच्या कोपर्यात पानाची पिचकारी मारत असतात. त्या पिचकार्या बघून अक्षरशः मळमळायला होत. बसमध्ये तर बसल्या जागेवर पिंक मारतात. त्यामुळे बसमध्ये खिडकीशी बसण्याचे धाडस होत नाही. लघवीसाठी मुतार्या बांधल्या तर त्या इतक्या घाण केलेल्या असतात की तिथे एक क्षणभरही थांबवत नाही. मुतार्या फारच घाण झाल्या की लोक मुतार्याच्या बाहेर धार लावून टाकतात.
आपल्या अशा किती सवयी वर्णाव्यात ? आपण आपल्या सवयीमुळे किती तरी रोगांचा फैलाव करीत असतो याची काही म्हणजे काही क्षिती नसते. खोकताना, ंशंकताना काही पथ्ये पाळली पाहिजेत अशी शिकवण तर आपल्याला कधी दिलेलीच नसते. आपल्यावर कोणाशी जवळून बोलण्याची वेळ येते तेव्हा तडाचा इतका दुर्गंध येतो की ते बोलणे कधी संपतेय याची आपण वाट पहातो. वरून पाणी पिणे, पाणी पिल्यानंतर ग्लास धुणे, मडक्यातले पाणी त्याच ग्लासने न घेणे याची तर काही गरज आहे हेच आपल्या गावी नसते. आपल्या या सवयीच आपल्या दारिद्र्याचे लक्षण आहेत असे म्हटले जाते खरे पण फार सूक्ष्म विचार केला असता त्या सवयी आपल्या दारिद्र्याचे कारण आहेत असे लक्षात येते. भारतात खेड्यातच काय पण शहरातही उघड्यावर शौचाला बसण्याची एवढी सवय आहे की त्यांना शौचालये बांधून दिली तरी ते त्यांचा वापर करीत नाहीत. उघड्यावर शौच्याला बसणार्या महिलांची आपल्याला लाज वाटते पण किती महिला याबाबत जागरूक आहेत ? जयराम रमेश यांनी म्हटले ते खरेच आहे. उघड्यावर शौच्याला बसणार्या कितीतरी महिलांकडे मोबाईल फोन असतात. पण त्या मोबाईल फोनच्या खर्चात आपल्या घराजवळ शौचालय बांधावे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे भारतातल्या कोणत्याही खेड्यातच काय पण शहरातही नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेशच करता येत नाही. या अनारोग्यकारक सवयीचे फार वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतात.
खेड्यांतल्या लोकांना शहरातल्या लोकप्रमाणे रक्तदाब आणि मधुमेह असे आजार कमी होतात कारण त्यांच्या जीवनात तणाव नसतात आणि त्यांना जगायला मोकळी हवा मिळते पण या लोकांना पोटाचे विकार मोठ्या प्रमाणावर प्रामुख्याने होतात. याचे कारण उघड्यावर शौचाला बसण्याची सवय. ही एक सवय बदलली तर ग्रामीण भागातले कितीतरी आरोग्याचे प्रश्न सुटतील. आपल्या देशातल्या लहान बालकांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण हगवण हे आहे. त्याशिवाय मुला मुलींच्या पोटात होणारे जंत हेही कुपोषणाचे कारण आहे. ग्रामीण भागातल्या गायी आणि म्हशी मानवी विष्ठा खातात आणि त्यातील रोगजंतू त्यांच्या दुधात उतरतात. त्यातून लोकात अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे रोग झाले की त्यांना दवाखान्यात चकरा माराव्या लागतात. त्या दिवसाचा रोजगार बुडतो. खेड्यातल्या लोकांचा दवाखान्याचा खर्च शहरातल्या लोकांपेक्षा जास्त असतो कारण त्यांना त्यासाठी बससारख्या वाहनांनी शहरात यावे लागते. तिथे खाण्यापिण्यासाठी खर्च करावा लागतो आणि त्यामुळे ते अधिक गरीब होतात. तेव्हा या देशातल्या लोकांनी हा घाणेरडेपणा सोडला पाहिजे. स्वच्छ राहिले पाहिजे. आपल्या देशातला हा मोठा प्रश्न आहे. लोकांनी निर्माण केलेला आणि लोकांनी वाढवलेला.