निर्यातबंदीसाठी केंद्राला साकडे घालणार – अजित पवार

यवतमाळ, दि.१५ नोव्हेंबर- राज्यात ऊस, सोयाबीन, कापूस या शेतमालाचे प्रामुख्याने उत्पादन होते. मात्र निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांना या पिकांचा योग्य मोदबला मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतमालावर निर्यात बंदी आणू नये यासाठी मुख्यमंत्र्यासह एक शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन सर्व शेतमालावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आ. संदीप बाजोरिया यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढे म्हटले की, विदर्भातील प्रमुख पीक कापूस आहे. कापसावरील निर्यातबंदीमुळे शेतकर्‍यांना त्याच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतमालाच्या उत्पन्नातून निघत नाही. कापसाची आधारभूत किमतही वाढविली नाही मात्र महागाई  लक्षात घेता आधारभूत किमतीत वाढ करणे गरजेचे आहे. विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना या संकटातून काढण्यासाठी शासनाने उपाययोजना केली. मात्र तरीही शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहे. यावर पुन्हा फेरविचार होण्याची गरज आहे.

Leave a Comment