व्यंगचित्रातून साकारणार आत्मचरीत्र- मंगेश तेंडूलकर

पुणे-व्यंगचित्र हे द्रुष्य माध्यम असून १० हजार लेखांचे काम एक चित्र करु शकते इतके व्यंगचित्रात सामर्थ्य आहे असे सांगत,आपले आत्मचरित्रही व्यंगचित्रांच्या माध्यमातूनच साकारण्याचा मानस,नाबाद पंचाहत्तरी पार करणारे जागतिक दर्जाचे जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी व्यक्त केला आहे.व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर मंगळवारी (१५ नोव्हेंबर) वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. याचे औचित्यसाधून त्यांच्याशी केलेली ही बातचीत.
     आयुष्यातील मागील ७५ वर्षांकडे पाहता सर्व सुख-दुःखही पांढर्‍या-काळ्या रंगात चितारलीत असे दिसते. रंगिबेरंगी दुनियेत आयुष्यातील सर्व उतार-चढाव फत्त* याच दोन रंगात सामावून गेली आहेत. आपली स्वतंत्र विचार प्रणाली आहे. त्यामुळे आपण आणि आपले सहकारी राजकीय वातावरणापासून अलिप्त राहिलो आहोत. सभोवताली घडणार्‍या परिस्थितीवर चित्रांच्या माध्यमातून भाष्य करत राहिलो, म्हणूनच चांगले व्यंगचित्रकार होवू शकलो अशा भावना तेंडूलकर यांनी व्यत्त* केल्या.
वयाची पंचाहत्तर वर्षपूर्ण झाली तरी आयुष्यात अजून नवीन काही करायचे आहे. आजपर्यंत नकोशी मुलगी, दहशतवाद, वाहतुक प्रश्न याबाबत व्यंगचित्रातून भाष्य केले आहे. मात्र, आता याच शस्त्राच्या सहाय्याने माणसाच्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न राहणार आहे असा नवा संकल्प मंगेश तेंडुलकर यांनी या निमित्ताने सोडला.  
आपल्या व्यंगचित्रांच्या प्रवासाबाबत बोलताना ते म्हणतात, १९५४ सालापासून व्यंगचित्र काढण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आपली व्यंगचित्रे वयाचे बोट धरुन चालत होती.  नंतर तरुण अवस्थेत सोप्या चित्रसंकल्पनातून  कानात वारे शिरल्यासारखी सभोवतालच्या परिस्थितीवर भाष्य करुन क्षितिजापर्यंत संचार करु लागली. साधारणतः वयाच्या ४० नंतर ती जमीनीवर आली आणि आता ती माझ्यासारखी अवघड होत चालली आहेत. पर्यांय नसला तरी माझे पंख चित्रातच येवून स्थिरावतात. चहा करायचा म्हटल की कशी पावडर आणि साखर डोळ्या समोर येते तसे ब्रश हाती घेतला की आपोआप कॅनव्हासवर चित्र साकारले जाते.
सद्यस्थितीत भारतीय व्यंगचित्रकलेचा विचार करता, परदेशाच्या तुलनेत भारतात खूप चांगली कला आणि उत्तम कलाकार आहेत. परंतु, परदेशाच्या तुलनेत  भारतीय व्यंगचित्रकलेबद्दल समाजात असलेली उदासीनता आणि कमी प्रसिद्धी ही एक मोठी शोकांतिका आहे असे मंगेश तेंडुलकर यांनी परखडपणे मांडले. व्यंगचित्रकला ही एक उत्तम भाष्य करणारी कला असून त्याला कोणत्याही भाषेचे बंधन नसते. मात्र, भारतात या कलेबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी स्वतः व्यंगचित्रकारांनी पुढाकार घेवून आपल्या चित्रांच्या माध्यमातून या कलेबद्दल आदर निर्माण करण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळवून देणारे हे कलेचे क्षेत्र आहे. याचमुळे तरुण वर्ग या क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. परंतू, ही सोपी कला नाही। यासाठी खुप परिश्रम करावे लागतात. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करताना मंगेश तेंडुलकर म्हणतात, कलाक्षेत्रात सध्या झपाट्याने बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा यामध्ये शिरकाव होत आहे. यासाठी व्यंगचित्र काढताना केवळ ब्रशचा वापर न करता आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हाताचा वापर करुनही चित्र रेखाटता येणे महत्वाचे आहे हे त्यांनी अधोरेखित केले.

Leave a Comment