माँ बिमार,मंत्री लाचार

काँग्रेसवाल्यांना कधी कोणती कविता सुचेल याचा काही नेम नाही.नेत्यांची चापलुशी करताना तर त्यांची रसवंती फार चालते.मद्यप्राशन केले नसेल तर ठीक पण नेहमीप्रमाणे दारुच्या नशेत कविता केली असेल तर त्या कवितेने आपल्या नेत्याचे आणि पक्षाचेही वस्त्रहरण होत आहे याचे त्यांना भान रहात नाही.एकंदरीत त्यांना भान हा प्रकार माहीतच नसतो. दारू प्यालेला माणूस वेडावाकडा चालत असतो हे तर सर्वांना माहीत असतेच पण त्याची कथित प्रतिभा शक्तीही अशीच वेडी वाकडी वळणे घेत असते. उत्तर प्रदेशात अशा कार्यकर्त्यांना काही तोटा नाही. आता उत्तर प्रदेशाच्या धावपट्टीचा वापर करून आपले नेते राहुल गांधी यांचे विमान राष्ट*ीय राजकारणात वेगाने उडावे म्हणून ही मंडळी इतकी बेताब  झाली आहे की आपण काय करीत आहोत याचे त्यांना भान राहिलेली नाही. उद्या उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या विमानाचे उड्डाण होण्यासाठी मोठी रॅली आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने, राहुलजी करो नेतृत्व का स्वीकार, अशी हाक काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्व स्वीकाराला ही मंडळी खूप  आतुरलेली आहे हे दाखवण्याची स्पर्धा पक्षात लागलेली आहे.
    असा शो केल्याशिवाय काँग्रेस संस्कृतीत असल्या सारखे वाटत नाही पण तो शो करण्याचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे पोस्टर. पोस्टर तर झकास झाले पाहिजे. कविता केली की ते झकास होते पण, पोस्टरवरची कविताही झकास जमली पाहिजे आणि तिच्यातले यमकही जुळले पाहिजे. मग यमक जुळवणारे काही उत्साही कवी कार्यकर्ते नवटाक पावशेर झोकून कामाला लागले. शब्दांशी झगडा करायला लागले. करो स्वीकार करो स्वीकार म्हणून डोकी खाजवायला लागले. पण कार कार काही जमेना. काही जुने बुजुर्ग तिथे असते तर त्यांना इंदिरा गांधी यांच्या काळातली छान कविता आठवली असती. ती राहुल गांधीच्या काकाच्या बाबतीत होती. तो काका म्हणजे संजय गांधी. त्याने १९७१ साली लहान कार तयार करण्याचे वेड डोक्यात घेतले होते. ती लहान कार म्हणजे मारुती कार. त्या काळात त्याने आठ ते दहा हजार रुपयांत कार देण्याची योजना आखली होती. हरियाणाचे तेव्हाचे मुख्यमंत्री बन्सीलाल यांनी आपल्या पदाचा (गैर) वापर करून या कारखान्याला गुरगाव येथे फुकट जमीन दिली होती पण शेवटी संजय  अंकलची ती कार तयार झालीच नाही. जपानच्या सुझुकीशी तिची सांगड घालण्यात आली आणि तिचे राष्ट*ीयीकरण करून तिला सार्वजनिक उद्योग करण्यात आले. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्या कुचकामी शिक्षण व्यवस्था राबवून देशात लाखो बेकार तयार करीत होत्या. त्यामुळे काही कवींनी एक कविता वजा घोषणा तयार केली होती. बेटा कार बनाता है । माँ बेकार बनाती है।। आता राहुल गांधी यांचा हा स्वीकार आला. अनेक शब्दांशी झटापट केली पण कार कार काही जुळेना. एखादा शब्द समोर आला की नकारच मिळायला लागला. कोणत्याही शब्दाला होकार मिळेना. पोस्टर तर तयार होणे गरजेचे होते. ते तयार करणारा नेता अभय तथा बाबा अवस्थी कवींना झापायाला लागला. इतक्यात एका बेवड्याच्या डोक्यात प्रकाश पडला. कार ला कार च हवा असे काही नाही. यमक जुळवायला केवळ र हवा आहे. मग कार काय की मार काय, कविता जुळू शकते. त्याने कविता तयार केली. ‘माँ बिमार, मंत्रिमंडल लाचार, राहुलजी करो नेतृत्व स्वीकार.’ ही कविता तयार होताच अवस्थीची अवस्था अशी काही झाली की विचारायची सोय नाही. राहुलजींनी नेतृत्व स्वीकारावे यासाठीचा आपला टाहो आता त्यांच्यापर्यंत पोचणारच अशी त्याच्या मनाची खात्रीच झाली. ही कविता, राहुलजीची अँग्री यंग अवस्थेतली छबी आणि अवस्थीचा फोटो असे साधारण ३० फूट उंचीचे पोस्टर झळकले.
    तेवढे ते मोठे असणे आवश्यकच आहे कारण राहुल गांधी यांची प्रतिमा आता जुलुम आणि अन्यायाचा कट्टर वैरी अशी तयारच झाली आहे अशी दिग्विजयसिग यांच्यासह सगळ्या काँग्रेसजनांची खात्री पटली आहे मग पोस्टरही तसेच भव्य असायला हवे. एकंदरीत हे काव्य आणि पोस्टर झळकले आणि ते प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा रिटा जोशी बहुगुणा यांनी पाहिले तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. असे पोस्टर आणि त्यावरची ही कविता वाचल्यावर त्यांना, यापेक्षा आपल्याला, राहुल गांधी आणि सनिया गांधी यांना तसेच काँग्रेस पक्षाला कोणी शिमग्यातला उखाणा घालून शिवी दिली असती तर परवडले असते असे वाटले. सोनिया गांधी या आजारी आहेत आणि त्या काम करू शकत नाहीत हे पक्षातले रहस्य इतक्या जाहीर पणाने पोस्टरवरच्या कवितेतून जाहीर करण्याचा हा प्रकार पाहून त्या हतबद्ध झाल्या. त्यांनी ते पोस्टर ताबडतोब उतरवण्याचा आदेश दिला.  हे पोस्टर कोणी लावले होते हे तर उघडच होते. त्याला कसली शिक्षा करावी तर पंचाईत होईल म्हणून त्या निष्ठावंत कार्यकर्त्याला काही करण्यापेक्षा कविता करणार्‍या त्या बेवड्या कवीच्या दारूत मायावती यांनी काही खास औषध मिसळले होते की काय याचा शोध घेण्याचे फर्मान सोडण्यात आले.

Leave a Comment