जीवनातील काही चुका चांगल्याही ठरतात – आशा भोसले

पुणे, दि.१२-‘‘घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्याने समाजाने व चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तींनी मला खूप त्रास दिला.मात्र घर सोडण्याची चूक केली नसती, तर आज ‘आशा भोसले’ असे नाव कमवता आले नसते. त्यामुळे जीवनातील काही चुका चांगल्याही ठरतात,’’ अशा भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज व्यक्त केल्या. तसेच परदेशातील नागरिकांकडून जेव्हा भारतीय कलाकारांचे कौतुक केले जाते, त्यानंतरच आपल्या देशात त्या कलाकारांचा गौरव केला जातो, तोपर्यंत का केला जात नाही, अशी खंतही व्यक्त केली.
 आमदार अनिल भोसले मित्र परिवार आयोजित ‘ सलाम आशा ’ या कार्यक्रमात ११ हजाराहून अधिक गाण्यांचा उच्चांक करणार्‍या आशा भोसले यांचा पुणेकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर मोहनसिग राजपाल, आमदार अनिल भोसले, बापूसाहेब पठारे, जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, नगरसेवक बाळासाहेब बोडके, रेश्मा भोसले आदी उपस्थित होते. सत्काराच्या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या.
 भोसले म्हणाल्या की, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले नसते तर माझ्या समोर अडचणी निर्माण झाल्या नसत्या. मी लता मंगेशकर यांच्या मागे ङ्गिरले असते. मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी त्रास सहन करत गात राहिले. त्यातून पैसा आणि नाव मिळत गेलं. आज मागे पाहिले तर असे वाटते की, आपण खूप चुका केल्या. मात्र त्यातून चांगलेही घडले.
जगात माझ्या गाण्याची प्रशंसा होते, मात्र बॉलीवूडकडून त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त करत त्या म्हणाल्या की, आगीतून चालत शारीरिक, मानसिक त्रास सहन करत गेल्या ५६ वर्षांपासून रक्त आटवून विविध भाषेतील वेगवेगळ्या प्रकारची गाणी गात आले आहे. त्यामुळे गायन ही इतर कलांपेक्षा फार अवघड कला आहे, असे मला वाटते. म्हणून यापुढील काळातही मी गाणे शिकत राहणार आहे. गाण्याबरोबर मला जेवण करायलाही खूप आवडते. स्वतःच्या हाताने एखादा पदार्थ केला तर एक गाणं रेकॉर्ड केल्याचा आनंद मला होतो.
पुण्यातील तुळशीबाग आजही मला आवडते, असे सांगून त्यांनी पुण्यात लक्ष्मी रस्तालगत पुना गेस्ट हाऊसच्या समोर राहत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच खरं आणि स्पष्ट बोलणं हा स्वभाव असल्याने मी राजकारणात गेले नाही, असेही भोसले म्हणाल्या .
आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भोसले यांना स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ अजित पवार यांच्या हस्ते तर साडी रेश्मा भोसले यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातील गायिका अनुराधा मराठे, केतकी माटेगावकर व प्रशांत नासेरी यांनी आशा भोसले यांनी गायलेली गीते सादर केले. त्यांना पराग माटेगावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी साथ दिली.

1 thought on “जीवनातील काही चुका चांगल्याही ठरतात – आशा भोसले”

Leave a Comment