उच्च दर्जाचे संशोधन आवश्यक – डॉ. बाबा कल्याणी

पुणे, दि. १२- देशात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर उद्योगांचा विस्तार झाला आहे.मात्र स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतरही अनेक विषयातील तंत्रज्ञानासाठी भारताला परदेशावर अवलंबून रहावे लागते. देशाला तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण बनविण्यासाठी उच्च दर्जाचे संशोधन आवश्यक आहे, असे मत भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.  बाबा कल्याणी यांनी व्यत्त* केले.
पुणे विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या तंत्रज्ञान विभागाचे औपचारिक उद्घाटन डॉ. कल्याणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. संजय चहांदे होते. प्रमुख पाहूणे म्हणून आयआयटी दिल्लीचे संचालक डॉ. रघुनाथ शेवगावकर, प्राज इंडस्ट*ीचे संचालक प्रमोद चौधरी, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. मा. ल. जाधव, अधिष्ठाता डॉ. अतुल पडळकर, विभाग प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यावेळी उपस्थित होते.
डॉ. कल्याणी म्हणाले, मागील सात-आठ वर्षापूर्वीपर्यंत देशात कारच्या इंजिनचे डिझायनही तयार होत नव्हते. यामुळे तंत्रज्ञानावर संशोधन करण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्या सयुत्त* विद्यमाने उपक्रम राबविण्यात आले. तंत्रज्ञान क्षेत्रात देशाची प्रगती लवकर होईल. पुण्यातील वाहतूक कोंडी हा पोलिसांचा प्रश्न नाही  तो सर्वांचा आहे. यामुळे अशा स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढणार्‍या आणि देशाला आवश्यक असणार्‍या तंत्रज्ञानाचे संशोधन करण्यावर सर्वाधिक भर द्यायला हवा, असे डॉ. कल्याणी यांनी सांगितले.
डॉ. शेवगावकर म्हणाले, शिक्षणसंस्था आणि उद्योग क्षेत्र यांनी एकत्रितपणे अभ्यासक्रम चालविले तर उच्चदर्जा असलेले प्रशिक्षीत मनुष्यबळ, आवश्यकता असलेल्या तंत्रज्ञानाचे संशोधन या गोष्टी सहजपणे होतील.  
विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागात विविध औद्योगिक कंपन्यांच्या सहभागातून  एम.टेक-पीएच.डी. हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या अभ्यासक्रमास  ३६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पडळकर यांनी केले. सूत्रसंचलन पी.के. तामखडे यांनी तर आभार डॉ. अभ्यंकर यांनी मानले.

Leave a Comment