सन ड्यू अपार्टमेंट पुणे महापालिकेने ताब्यात घ्यावी – कुंभार

पुणे दि.२९- पुण्याच्या प्रभात रोडवरील सन ड्यू अपार्टमेंट ही इमारत पुणे महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांना दिलेली पंधरा दिवसांची मुदत आता संपली असल्याने पुणे महापालिकेनेच आता ही इमारत ताब्यात घ्यावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केली आहे.
  प्रभात रोडवरील ही इमारत उभी असलेला भूखंड शाळेसाठी आरक्षित असतानाही मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात हे आरक्षण उठवून त्यांचे जावई गिरीश व्यास यांना हस्तांतरीत करण्यात आला होता. तेथे व्यास यांनी दहा मजली सन ड्यू ही इमारत बांधली. मात्र हे बांधकाम सुरू झाल्यापासूनच विजय कुंभार यांनी आरक्षण उठविर्‍याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती आणि अक्षरशः एकट्याने लढून केस जिकली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालात करण्यात आलेल्या अपिलाचा निकाल व्यास यांच्या विरोधात गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने व्यास यांनी ही इमारत पाडून टाकावी अथवा पुणे मनपाच्या ताब्यात द्यावी असा निकाल देऊन त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. हा निकाल १२ आक्टोबरला लागला होता म्हणजेच ही मुदत आता संपली आहे. महापालिकेला दिवाळीची तीन दिवस सुट्टी होती त्यामुळे शनिवारी या इमारतीबाबत महापालिकेने हालचाल करून तिचा ताबा घ्यावा अशी अपेक्षा कुंभार यांनी व्यक्त केली आहे.कुंभार म्हणाले की हे प्रकरण आता अधिक लांबविण्यात कांही अर्थ नाही. माझे म्हणणे बाजूला सारले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन तरी महापालिकेने करायलाच हवे इतकेच आमचे म्हणणे आहे.

Leave a Comment