सात अब्ज जीव

मानवतेच्या इतिहासात आजची रात्र फार महत्त्वाची आहे.आज रात्री १२ वाजता या पृथ्वीवर जे मूल जन्माला येईल ते खास मानाचे असेल.कारण त्याच्या जन्माने जगाची लोकसंख्या ७०० कोटी होणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेने या ७०० कोटीव्या बालकाचे स्वागत करण्याचे ठरवले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड या संघटनेने या दिवशी एका गावात जन्माला येणारी सात बालके हेरून त्यांची नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी एका गावात सात बालके त्याच दिवशी जन्मतील याची काही खात्री देता येत नाही. म्हणून अशी खात्री असलेले गाव निवडण्यात आले. ते आहे उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेश हे भारतातले सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. एवढेच नाही तर तिथे कुटुंब नियोजनाचा विषय कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे तिथला जननदरही जास्त आहे. उत्तर प्रदेशात गरिबीही जास्त आहे. गरिबीत  पोट चांगले पिकते. श्रीमंतांना मुले कमी असतात पण गरिबांना ती जास्त असतात. कारण लोक श्रीमंत होत जातात तशी प्रजनन क्षमता कमी होत जाते.
    उत्तर प्रदेशाची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या तीन टक्के आहे. पण जगातल्या गरिबांपैकी १० टक्के गरीब लोक उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशाची लोकसंख्या आणि प्रजननक्षमता मायंदळ आहे. या राज्यात दररोज १५ ते १६ हजार मुले जन्माला येतात. त्यातली ३५० मुले लखनौच्या परिसरात जन्म घेतात. याचा अर्थ लखनौ शहर आणि त्याच्या आसपासच्या खेड्यांत दर चार मिनिटाला एक बाळ ट्यांहा  म्हणत असते. ३१ ऑक्टोबरच्या पहिल्या मिनिटाला एखादे बाळ जन्माला येण्याची आणि एकाच गावात सात एका दिवसात सात मुले जन्माला येण्याची शक्यता याच परिसरात आहे. म्हणून लोकसंख्या विषयक तज्ञांनी लखनौपासून २३ किलो मीटर अंतरावरचे माल हे खेडे या स्वागत समारंभासाठी निवडले आहे. या गावात बाळंतपणाची ३१ तारीख दिलेल्या काही महिला आहेत. त्या बाळंत झाल्या नाहीत तरी त्या दिवशी कृत्रिम उपायांनी त्यांना बाळंत करण्याची सोय विज्ञानाने केलेली आहेच. म्हणजे मानवतेच्या संख्येतले ७०० कोटीवे बालक आणि त्या दिवशी  जन्मणारी सात बालके हा मान  उत्तर प्रदेशातल्या या गावाला मिळणार आहे. १९९९ साली  ६०० कोटीवे बालक असेच जन्माला आले होते आणि तो मान युरोपातल्या बोस्निया या देशातल्या एका बालकाला मिळाला होता.
    मानवी लोकसंख्या वाढत आहेच पण या वाढीचा वेगही वाढत आहे. मानवी जातीची एक अब्ज ही लोकसंख्या  सोळाव्या शतकात गाठली गेली असेल. नंरतची एक अब्ज संख्या वाढायला दोनशे वर्षे लागली. पाच अब्जावरून सहा अब्ज व्हायला मात्र २२ वर्षेच पुरली. आता तर हा वेग इतका वाढला आहे की जगाची लोकसंख्या सहा अब्जावरून सात अब्ज व्हायला केवळ १२ वर्षे पुरली. आता ही लोकसंख्या आठ अब्जाचा पल्ला केवळ ९ वर्षात गाठेल असा अंदाज आहे. म्हणजे केवळ लोकसंख्याच वाढत आहे असे नाही तर लोकसंख्यावाढीचा वेगही वाढत आहे. त्यामुळे काही लोक चिता व्यक्त करीत असतात. पण लोकसंख्यावाढीची जगाच्या विविध भागातली स्थिती निरनिराळी आहे. सगळ्या जगात ती वाढत नाही. अविकसित देशात संख्या वेगाने वाढत आहे पण विकसित देशात ती झपाट्याने कमी होत आहे. याचसाठी उत्तर प्रदेशाचे उदाहरण समोर ठेवले. जिथे गरिबी जास्त असते तिथे लोकसंख्या वेगाने वाढत असते पण जिथे समृद्धी जास्त असेल तिथे महिलांची प्रजनन क्षमता आपोआप कमी होत असते. रतन टाटा यांना डझनभर मुले असती तर काही बिघडले नसते पण त्यांना लग्न करायलाही सवड मिळालेली नाही. त्यांच्या आईवडलांनाही ते एकुलते एकच आहेत.
    आज अमेरिका,जपान, जर्मनी, स्विडन असे श्रीमंत देश आपली लोकसंख्या कमी का होत आहे या प्रश्नाने सचित झाले आहेत. कॅनडातही हा प्रश्न आहे. २०१६ साली कॅनडाच्या लोकसंख्येची उणे वाढ सुरू होणार आहे.  इटलीत कष्टाची कामे करायला माणसेच नाहीत. त्यामुळे असले संपन्न देश लोकसंख्येची आयात करण्याच्या मनस्थितीत आहेत. लोकसंख्या वाढत आहे ती आफ्रिकन देशात, चीनमध्ये आणि दक्षिण आशियात.  आपण आता गाठत असलेल्या ७०० कोटी लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या या देशात आह. हे दश प्रगती करायला लागले की तिथली लोकसंख्याही कमी व्हायला लागेल. लोकसंख्या कमी होण्यासाठी काही गोष्टी आवश्यकच असतात. त्यातली पहिली म्हणजे स्त्रीयांची प्रजनन क्षमता मुळातच कमी होणे. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचे प्रमाण वाढणे आणि तिसरे म्हणजे महिला कमावत्या होणे. जिथे महिला शिकून नोकर्‍या करायला लागतात तिथली लोकसंख्या आपोआप आटोक्यात येते असा अनुभव आहे. तेव्हा आज लोकसंख्या वाढत आहेच पण ती काही आपत्ती नाही. संख्या कितीही वाढली तरी सर्वांना खायला मिळेल एवढे धान्य पिकू शकते. तेवढी प्रगती शेतीत झाली आहे. म्हणून आता जन्मणारे ७०० कोटीवे बालक ही आपत्ती न वाटत नाही. त्याचे स्वागत केले पाहिजे.

Leave a Comment