
लीबियाचा हुकूमशहा मारला गेला आहे.त्याचा खातमा झाल्याने त्याची तिथली ४२ वर्षांची एकतंत्री राजवट संपुष्टात आली आहे.गेल्या फेब्रूवारीत इजिप्त मध्ये जनतेच्या उठावातून सत्तांतर झाले. या निमित्त दिसून आलेल्या जनजागृतीला अरब स्प्रिंग असे म्हटले जात होते. तिचे लोण लीबियामध्ये जाऊन पोचले. तिथे आता सत्तांतर झाले आहे. लीबिया हा उत्तर आफ्रिकेतला एक अतीशय छोटा देश आहे. मराठवाड्यातल्या कोणत्याही दोन जिल्हयांएवढा. या देशाची लोकसंख्या आहे ६२ लाख. १९६९ सालपर्यंत या देशामध्ये सुनासी वंशाची राजेशाही होती. १९६९ साली कर्नल मउम्मर गडाफी याच्या नेतृत्वाखाली देशात क्रांती झाली आणि राजेशाही उलथून टाकण्यात आली. कर्नल गडाफीने सत्ता हस्तगत करून तिथे एकाधिकारशाही प्रस्थापित केली आणि देश हा समाजवादी प्रजासत्ताक असेल असे घोषित केले. या देशाने आपल्या नावात समाजवाद आणि प्रजासत्ताक अशा संज्ञा वापरल्या असल्या तरी तिथलीसत्ता एका जुलमी तानाशहाची आणि रानटी वाणाची होती. तिथे केवळ एकच पक्ष होता आणि तोच निवडणुका जिकत होता.
गडाफीने समाजवाद आणि लोकशाही यांच्या नावाखाली देशामध्ये घराण्याची हुकूमशाही प्रस्थापित केलेली होती. ती लोकांनी काही काळ सहनही केली होती कारण कर्नल गडाफी याने सत्ता हस्तगत केली तेव्हा त्याचे वय केवळ २७ वर्षे होते. देशात क्रांती केली तेव्हा तो देशात कमालीचा लोकप्रिय होता. केवळ आपल्या देशातच नव्हे तर सगळ्या अरबी देशांमध्ये लोकप्रिय ठरला होता. त्याने अरब नॅशनॅलीझम ही कल्पना पुढे मांडली होती. गडाफीने अरबी जनतेला एक स्वप्न दाखवले होते. ते स्वप्न अमेरिकेला धोकादायक वाटत होते. ते स्वप्न होते यूएसए म्हणजे युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकेच्या किवा यूरोपीय संघाच्या धर्तीवर युनायटेड स्टेटस् ऑफ आफ्रिका या संघाच्या स्थापनेचे. आफ्रिकेतले तेलसंपन्न देश अलग अलग होऊन भांडत राहणे अमेरिकेच्या आणि नाटो राष्ट*ांच्या हिताचे आहे पण हे देश असे संघटित झाले तर त्यांना मानवणार नाही. कारण तशा स्थितीत त्यांना तेलाच्या अर्थकारणात आणि राजकारणात मनमानी करता येणार नाही. म्हणून गडाफी गेली ४० वर्षे अमेरिकच्या डोळ्यात सलत होता. तो आता आपल्या गुणाने संपला आहे आणि अमेरिकेला आता लीबियात आपल्या सोयीची नवी मांडणी करणे सोपे जाणार आहे.
गडाफीच्या रूपाने अमेरिकेने आपल्या विरुद्ध आवाज करणारा सद्दाम हुसेन पाठोपाठचा दुसरा मुस्लिम नेता खलास केला आहे. तो करताना अमेरिकेने संयुक्त अरब अमिरातीचाही वापर केला आहे. त्यामुळे हा मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन असा सामना आहे असा आरोप करण्याची सोय मुस्लिम दहशतवादी संघटनांना राहिलेली नाही. गडाफी हा अमेरिकेच्या डोळ्याला डोळा देत होता. त्याने हा आपला पवित्रा सद्दाम हुसेन किवा फिडेल कॅस्ट*ो यांच्या प्रमाणे सतत कायम ठेवला नाही. त्याने अमेरिकेशी कधी पंगा घेतला, कधी दहशतवादी मार्गाने खोडी काढली, कधी वैचारिक बंड केले. कधी जमवून घेतले, कधी तडजोड केली तर कधी ताटाखालचे मांजर होण्याचीही भूमिका घेतली. त्यामुळे अमेरिका आणि गडाफी यांचे संबंध लव्ह अँड हेट असे संमिश्र राहिले. अलीकडे तर त्याने जवळ जवळ शरणागती स्वीकारण्याचीच तयारी दाखवली होती म्हणून अमेरिकेला त्याच्या विरोधात इराकप्रमाणे धडक कारवाई करून त्याला संपवता आले नाही. पण, त्याच्या देशातल्या लोकांनीच त्याच्या विरोधात बंड केले. त्यांनाही सरळ मदत करण्याची भूमिका अमेरिकेने घेतली नाही. नाटो राष्ट*ांच्या मदतीने त्यांच्या हातून अमेरिकेने गडाफीचा काटा काढला.
अमेरिकेसाठी तो धोकादायक होता कारण त्याने काही काळ आपल्या देशात दहशतवाद्यांना आश्रय दिलेला होता. लीबिया हे अनेक दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांना लपण्याचे सुरक्षित ठिकाण वाटत होते. सध्या पाकिस्तानचीही चाल तशीच आह. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना बळ देत आहे. अमेरिकेला पाण्यात पाहणारे अतिरेकी पाकिस्तानात रहात आहेत आणि पाकिस्तान सरकार त्यांना आश्रय देत आहे. अमेरिकेला अफगाणि स्तानात शांतता प्रस्थापित करायची आहे. १९८० साली हा देश अमेरिकेने रशियाच्या तावडीतून मुक्त केला आहे पण तालीबान संघटना आणि तिथले बडे जमीनदार यांनी आपापसातल्या संघर्षात या देशाची वाट लावली आहे. गेल्या ३० वर्षांपासून तिथे हिंसाचार सुरू आह. त्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे पण पाकिस्तानची चाल नेमकी उलटी आहे. त्यावरून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या संबंधात तणाव आला असून परस्परांना आव्हाने आणि प्रतिआव्हाने देण्यास सुरूवात झाली आहे. तेव्हा आता अमेरिका पाकिस्तानात आपली सेना घुसवून तिथे कधी इराक सारखी कारवाई सुरू करील याचा काही नेम राहिलेला नाही. इराण, इराक, इजिप्त, लीबिया यांच्या पाठोपाठ आता पाकिस्तानची पाळी आह. लिबियानंतरचे परिवर्तनाचे लोण असे भारताच्या दारापर्यंत आले आहे.
