दिवाळी आम आदमीची

दिवाळीचा सण आला आहे.कालच भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिग यांनी बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या निमित्ताने झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेपुढे भाषण करताना या योजनेत देशाचा विकास दर ९ टक्के राहील या घोषणेचा फटाका फोडल. आता देशातला सामान्य माणूस हे समजून चुकला आहे की देशाचा विकास, वाढते  वट्ट राष्ट्रीय उत्पन्न, वाढती निर्यात आणि काही पटींनी वाढत चाललेले दरडोई उत्पन्न यांचा आणि आपला काहीही संबंध नाही. सरकार अशा आकड्यांचे फटाके  फोडत असले तरी हे फटाके प्रत्यक्षातले नसतात तर ते आगामी काळातले अंदाज असतात. सरकारच्या या घोषणा आणि वस्तुस्थिती यांचा काही संबंध नसतो. हे सारे वाढलेले उत्पन्न श्रीमंतांच्या तिजोर्‍यांत जात असते. देश श्रीमंत होत असताना सामान्य माणूस मात्र आहे तिथेच रहात असतो. तो महागाईच्या चटक्यांनी भाजून निघत असतो. म्हणूनच आता सामान्य माणसांची दिवाळी काटकसरीची झाली आह. असोचेम या संस्थेने केलेल्या एका पाहणीत सामान्य माणसाचे सामान्य जगणे इतके तापदायक झाले आहे की त्यांनी आता आपल्या दिवाळीच्या खर्चात ४० टक्के कपात केली आहे.
    खर तर दिवाळी हा आनंदाचा सण. भारतीय लोक दिवाळीची फार आतुरतेने वाट पहात असतात. एका कुटुंबातले नाना कारणांनी पांगलेले लोक दिवाळीत एकत्र येतात. परस्परांच्या भेटी होतात आणि क्षेमकुशल समजते. माणसाची मनं उजळणारा हा सण. भारतीय लोक पोटापाण्या साठी आणि नशीब काढण्यासाठी लांबलांब चालली आहेत. जगातल्या बहुतेक देशात  भारतीय दिसायला लागले आहेत.  ते लोक जग बघत आहेत आणि जगाच्या तुलनेत आपली संस्कृती श्रेष्ठ असल्याचा अनुभव त्यांना यायला लागला आहे. परदेशात गलेल्या या लोकांनी आपल्या परंपरां विषयीचा बुजरेपणा सोडून दिला आहे. अनेक देशांत दिवाळी साजरी व्हायला लागली आहे. तिथले भारतीय लोक मोठ्या आत्मविश्वासाने दिवाळीचा आनंद व्यक्त करायला लागले आहेत. आता बघता बघता दिवाळी हा सार्‍या जगात कमी अधिक प्रमाणात साजरा होणारा सण झाला आहे. गतवर्षी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हेही  भारताच्या दिवाळीत सहभागी झाले होते.भारतीय लोक अनेक गोष्टी दिवाळीत करीत असतात. नवी खरेदी करायला दिवाळीचा मुहूर्त लागतो. नवी कार घ्यायची असेल तर  ती दिवाळीला घरात आणली जाते. नवे घर घ्यायचे असेल तर  दिवाळीला नाव नोंदवतील.
    स्वतःच घर बांधणार असतील तर दिवाळीलाच पाया खोदायला सुरूवात करतात. घरात मिक्सर, वॉशिग मशीन, टीव्ही घ्यायचा असेल तर तोही दिवाळीलाच घरात आणला जातो. पती पत्नीलाा एखादा सोन्याचा नवा दागिना करणार असेल तर तो पाडव्याची ओवाळणी म्हणूनच करतो. भावा  बहिणींचा सणही हाच आहे. व्यापार्‍यांचे नवे वर्ष याच सणात सुरू होते. या सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे दिवाळी हा किती मोठ्या आर्थिक उलाढालीचा सण असेल याचा अंदाजही करता येत नाही. भारतीय लोक गरीब असोत की श्रीमंत असोत ते दिवाळीत आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठी नवी वस्तू खरेदी केल्याशिवाय रहात नाहीत पण यंदा भारतात खरेदीचा उत्साह जरा कमीच झालेला दिसत आहे. आपला आनंद कायम आहे पण आनंदाचा आविष्कार घडवणार्‍या गोष्टी वरचेवर लहान लहान होत चालल्या आहेत. सामान्य माणसासाठी तरी ही प्रक्रिया नक्कीच उघडपणे दिसायला लागली आहे. हाच परिणाम घरे आणि वाहनांच्या खरेदीवरही झालेला दिसत आहे. भारतीय     लोक दसर्‍याला वाहनांची मोठी खरेदी करतील अशी अपेक्षा होती पण वाहन विक्रेत्यांना निराश व्हावे लागले, कारण वाहनांच्या खरेदीतही मंदी आहे.. गेल्या दोन तीन महिन्यातून मंदी आणि सन्नाटा आहे तो  दसर्‍यालाही कायम राहिला.
    आता दिवाळीला तरी विक्री होईल अशी आशा लागली आहे. कार विकत घेणारा शेवटी नगदी पैसा कधी मोजत नसतो. रोख पैसे देऊन कार घेणारे फार कमी. कार खरेदी करायची तर बँकेतून लोण काढूनच खरेदी केली जाते. त्यामुळे कारच्या बाजारावर बँकेचे धोरण, व्याजाचे दर, मासिक हप्ता, यांचा परिणाम होत असतो. सध्या व्याजाच्या दराने केवळ कारच्या माकर्ेटवरच नाही तर सगळ्याच माकर्ेटवर परिणाम झाला आहे. दिवाळी आली तरी वाढत्या व्याजदराने प्रभावित झालेल्या माकर्ेटात काही उत्साह निर्माण होईल अशी बँकेची योजना जाहीर झालेली नाही. आता कंपन्यांनीच कारचा उठाव व्हावा म्हणून ग्राहकांना काहीसवलती द्यायला सुरूवात केली आहे. त्यांचा फायदा होऊन ग्राहक आकृष्ट झाले तरच अनेकांच्या घरात कारच्या खरेदीने दिवाळी साजरी होणार. अशाच सवलती घरांच्या बाबतीतही दिल्या जात आहेत. घरांच्या बाबतीतही बँकांच्या धोरणाचा अडथळा आहेच पण दिवाळीत कारच्या मानाने घरांच्या मागणीत थोडा उठाव होण्याची अपेक्षा आहे. शेवटी कार ही अत्यावश्यक गरज नाही. घर ही मात्र माणसाची गरज आहे. अडचणी सहन कराव्यात पण आपली हक्काची सावली असावी असे कोणालाही वाटत असते. पण सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला आहे हे खरे.

Leave a Comment